Join us

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी; भारत 'या' श्रीमंत देशासोबत करणार १० मोठे करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:01 IST

India-Singapore Deal: अमेरिकेने कर लादल्यानंतर भारत इतर पर्यायी देशांशी बोलणी करत आहे.

India-Singapore Deal: एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ जाहीर केला आहे, तर दुसरीकडे भारत इतर पर्यायांचा विचार करत आहे. या पार्श्वभूमीवर भारत लवकरच सिंगापूरसोबत १० महत्वाचे करार करणार आहे. या आठवड्यात होणाऱ्या दोन्ही देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीत तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास आणि डिजिटलायझेशन यासारख्या क्षेत्रात सुमारे १० सामंजस्य करारांना अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, या करारांतर्गत भारतातून सिंगापूरला सौरऊर्जा पोहोचवण्यासाठी समुद्राखाली केबल टाकण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला अंतिम रुप देण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया डेटा कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग पुढील महिन्यात भारताला भेट देऊ शकतात, त्यापूर्वी या सर्व प्रस्तावांना अंतिम रुप देण्याची तयारी सुरू आहे. भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय तिसरी बैठक उद्या(१३ ऑगस्ट) नवी दिल्लीत होणार आहे.

भारतातून सिंगापूरला ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजन निर्यात करण्याचा प्रस्तावदेखील आहे, जो द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी समग्र दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून पाहिला जात आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव सिंगापूरच्या सहा मंत्र्यांना भेटतील.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यात भारत-सिंगापूर संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात आले होते. भारत आणि सिंगापूरमधील बैठकीत कौशल्य विकासाशी संबंधित करारांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये विमान वाहतूक, सेमीकंडक्टर आणि प्रगत उत्पादन यासारख्या क्षेत्रात सहकार्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम आणि त्याला सामोरे जाण्याचे मार्ग यावर देखील बैठकीत मध्ये चर्चा होऊ शकते.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पनरेंद्र मोदीभारतअमेरिकाव्यवसायसिंगापूर