Join us

प्रॉपर्टी खरेदी-विक्रीच्या नावाखाली असा घातला जातो गंडा; फसवणूक टाळण्यासाठी ५ मुद्दे लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 16:19 IST

buying and selling property : पुण्यात एक प्रॉपर्टी मालकाच्या परस्पर २३ वेळा विकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. तुम्हीही प्रॉपर्टीचे व्यवहार करणार असाल तर काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

buying and selling property : मालमत्ता खरेदी किंवा विक्री करणे हे खायचं काम नाही. पुण्यात एक प्रॉपर्टी मालकाच्या परस्पर २३ वेळा विकण्यात आली होती. अशी लाखो प्रकरणे देशातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. यावरुन तुम्हाला पहिल्या वाक्याचं गांभीर्य लक्षात आलंच असेल. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी अनेक कागदपत्रांची आधी छाननी केली जाते. आजकाल, या कागदपत्रांशी संबंधित मालमत्तेच्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये खूप वाढ होत आहे. अनेक वेळा ग्राहकाकडून पैसे घेतले जातात आणि मालमत्ता त्याच्या नावावरही नसते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील एखादी मालमत्ता खरेदी किंवा विक्री करणार असाल तर तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून तुम्ही अशा जाळ्यात अडकू नये.

मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करताना रजिस्ट्री, नकाशा, एनओसी, टायटल डीड, उत्पन्न प्रमाणपत्र आणि बेनामी यासारखी अनेक महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. अशा स्थितीत या कामातील सर्व कागदपत्रे तुम्ही तपासून पहा. अनेक वेळा ही कागदपत्रे बनावट असतात, त्यामुळे फसवणूक होते.

प्रॉपर्टी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  1. जर मालमत्ता विक्रेत्याने तुम्हाला रजिस्ट्री, नकाशा इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे दाखवण्यास नकार दिला तर तुम्ही सावध व्हा. दस्तऐवज न पाहता कधीही निर्णय घेऊ नका.
  2. नोंदणीच्या वेळी, अधिकारी विक्री कराराशी संबंधित सर्व तपशील पूर्णपणे तपासतात, जर नावात काही चूक आढळली तर ती दुरुस्त करण्यास सांगितले जाते. अशा परिस्थितीत मालमत्ता विकणाऱ्या व्यक्तीच्या अशा चुकीकडे दुर्लक्ष करता कामा नये.
  3. याशिवाय, विक्री डीडमध्ये नोंदवलेले आधार कार्ड आणि पॅन कार्डमधील तपशील सारखेच असावेत. यात काही फरक दिसला तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
  4. मालमत्ता खरेदी करताना, टायटल डीड, विक्री डीड, बोजा प्रमाणपत्र आणि मालमत्ता कर पावत्या तपासून घ्या.
  5. रजिस्ट्री, एनओसी, उपयोगिता प्रमाणपत्र, ताबा पत्र, डीड नीट तपासा.

 

टॅग्स :गुन्हेगारीपैसागुंतवणूक