Gold Rate Hits All-Time High : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होण्यास अवघे २ दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. यावेळी सोनेही शांत राहिलेले नाही. मागणीत जोरदार वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे सोन्याने ८३७५० रुपये प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ८२,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने ही माहिती दिली आहे.
१ जानेवारी २०२५ पासून सोन्याच्या भावात तब्बल ४,३६० रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी सोने ७९,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवरून ८३,७५० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहचलं आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर २४ कॅरेट शुद्ध सोने ९१० रुपयांनी वाढून ८३,३५० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचले. दुसरीकडे चांदीही यात मागे राहिला नाही. चांदीचा भाव १,००० रुपयांनी वाढून ९३,००० रुपये प्रति किलो झाला, जो मागील व्यवहाराच्या दिवशी ९२,००० रुपये प्रति किलो होता.
एमसीएक्सवरील फ्युचर्स ट्रेडिंगमध्येही सोने २२८ रुपयांनी वाढून फेब्रुवारी महिन्यात ८०५१७ रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यात त्याची किंमत८१०९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. डॉलरच्या निर्देशांकात झालेली वाढ आणि अमेरिकेतील कमकुवत ग्राहक मागणी डेटा यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.
सोन्याचे दर का वधारले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच इतर देशांवर आयात शुल्क लादण्याची धमकी दिली. यानंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. “बाजारातील भागधारक यूएस फेडरल रिझर्व्ह (फेड) च्या व्याजदर धोरणावरील निर्णयाची वाट पाहत आहेत. तात्काळ व्याजदर कपातीची शक्यता कमी वाटत असली तरी सोन्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी पुढील मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल.
अर्थसंकल्पात सोने स्वस्त होणार?
मोदी सरकारने जुलै २०२४ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील शुल्कात कपात केली होती. त्यानंतर मौल्यवान धातूच्या दरात मोठी कपात झाली होती. सर्वसामान्यांनी या निर्णयाचे कौतुक केलं होतं. आता सोने ८३ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. अशा परिस्थितीत सरकारने पुन्हा दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.