Join us

अजूनही वेळ गेली नाही! सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची होणार चांदी; ८५ हजार प्रतितोळा होण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 16:44 IST

Gold Price : इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याने विक्रमी पातळी गाठली तर आश्चर्य वाटायला नको.

Gold Prices: सोन्या-चांदीसाठी भारतीयांचे प्रेम कोणापासून लपलेले नाही. भारतीयांना सोने खरेदी कोणतंही निमित्त पुरेसं असतं. आता तर नवरात्री, दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी असे एकामागोमाग एक मोठे सण येत आहेत. यानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होईल. लग्नकार्यात तर सोने खरेदी-विक्री प्रचंड वाढते. त्यामुळे आगामी काळात सोन्याला आणखी झळाळी येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी असणार आहे.

इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय देशात सणासुदीचा हंगाम सुरू असून त्यात सोन्याची मोठी खरेदी होत आहे. साहजिकच मागणी वाढल्याचा परिणाम सराफा बाजारावरही दिसून येईल. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. वर्ष संपायला ३ महिने शिल्लक असतानाही सोन्याने आधीच १९.८० टक्के परतावा दिला आहे.

जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव ३ हजार डॉलरपर्यंत जाणार?दिवसेंदिवस सोन्यामध्ये वाढणारी गुंतवणूक पिवळ्या धातूला झळाली देत आहे. सिटीग्रुप, गोल्डमन सॅक्स आणि बीएमआय यांचे सोन्याच्या दराबाबत एकमत झालंय. यांच्या अहवालानुसार सोन्याची किंमत प्रति औंस ३००० डॉलर जाऊ शकते. सध्या सोन्याच्या आंतरराष्ट्रीय दरांवर नजर टाकली तर ते २६७८.७० डॉलर प्रति औंस आहे. हाच वाढीचा वेग राहिला तर डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव प्रति औस ३ हजार डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा दर तुम्हाला जास्तीचा वाटू शकतो. मात्र, सोन्यात कायम सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याला खूप मजबूत आधार मिळतो. फक्त गोल्डमन सॅक्सने सोन्याची किंमत २९०० डॉलरपेक्षा जास्त असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. मात्र, संकटाने सोने व्यापाऱ्यांसाठी संधी निर्माण केली आहे. सोन्याची सध्याची पातळी तुम्हाला स्वस्त वाटू शकते. कारण वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरपर्यंत तुम्हाला १२ टक्क्यांपर्यंत आणखी परतावा मिळू शकतो. तीन महिन्यांत १२ टक्के वाढीचा अर्थ असा आहे की इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा कमोडिटी मार्केटवर परिणाम होईल. परिणामी मौल्यवान धातूंच्या किमती वाढतच राहतील.

भारतात सोन्याचे दर?देशात सध्या सोन्याचा भाव ७६३१५ रुपये प्रति १० ग्रॅम (MCX किंमत) आहे. डिसेंबरपर्यंत सोन्याने ८५ हजार रुपयांचा टप्पा पार केल्यास त्यात थेट १२ टक्क्यांनी वाढ होईल. त्यामुळे अजूनही गुंतवणूकदारांना सोन्यात संधी आहे.

टॅग्स :सोनंगुंतवणूकशेअर बाजार