Investment Secret :पैसा कमवायचा असेल तर व्यवसायाच हवा. नोकरीत फारतर तुम्ही एखादा फ्लॅट घेता, असे टोमणे तुमच्याही कानावर कधीतरी पडले असतील. काहीअंशी ते खरंही आहे. कारण, नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या पगाराचा मोठा हिस्सा आपल्या गरजा पूर्ण करण्यातच खर्च होतो, त्यामुळे भविष्यासाठी बचत करणे अनेकांना शक्य होत नाही. मात्र, एका कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने फक्त ९ वर्षांच्या कालावधीत आपली निव्वळ संपत्ती १ कोटी रुपयांपेक्षा जास्त केली आहे. ही गोष्ट नक्कीच सोपी नाही, पण त्याने केलेल्या प्रयत्नांनी हे शक्य झाले. रेडिटवर त्याने आपल्या यशाचं गुपित सांगितलं आहे.
९ वर्षांत नेटवर्थ १.०९ कोटींवरसुरुवातीला दरमहा फक्त ५३,००० रुपये पगार असलेल्या या व्यक्तीने सातत्याने गुंतवणूक आणि बचतीवर लक्ष केंद्रित केले. गेल्या काही वर्षांत नोकरी बदलल्यामुळे, प्रमोशन आणि चांगल्या इन्क्रिमेंटमुळे त्याचा पगार ५३ हजारांवरून २.५ लाख रुपये प्रति महिना झाला. त्याने मिळालेले बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न विनाकारण खर्च न करता, त्याचा वापर गुंतवणूक वाढवण्यासाठी केला. याच प्रयत्नांमुळे, आज त्याची निव्वळ संपत्ती वाढून १.०९ कोटी रुपये झाली आहे.
असं आहे पोर्टफोलिओचं गणितया व्यक्तीचा पोर्टफोलिओ विविध ठिकाणी विभागलेला आहे. आज त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ३९ लाख रुपयांचे डेट फंड आणि ७० लाख रुपयांचे इक्विटी गुंतवणूक आहे. यात म्युच्युअल फंड, शेअर्स, ईपीएफ आणि पीपीएफ यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी त्याने १५ लाख रुपयांचा लिक्विडिटी फंड देखील ठेवला आहे.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे सल्लेआपल्या या यशाबद्दल बोलताना त्याने काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
- मार्केटमध्ये 'वेळ' देणे महत्त्वाचे: बाजारात योग्य वेळ साधण्यापेक्षा, लवकर गुंतवणूक सुरू करणे अधिक महत्त्वाचे आहे. 'टाइमिंग द मार्केट' करण्याऐवजी 'टाइम इन द मार्केट' करणे फायदेशीर ठरते, असे त्याचे मत आहे.
- नियमित निरीक्षण: त्याने आपल्या गुंतवणुकीवर नियमितपणे लक्ष ठेवले. दर महिन्याला किंवा तीन महिन्यांनी एकदा तो आपला पोर्टफोलिओ तपासातो आणि आवश्यकतेनुसार अपडेट करतो.
- लिक्विड फंडचे महत्त्व: अनेक गुंतवणूकदार लिक्विड फंडमध्ये जास्त पैसे ठेवण्यास टाळाटाळ करतात, पण त्याने १५ लाख रुपयांपर्यंतचा आपत्कालीन निधी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे, गरज पडल्यास पैशांचा वापर सहज करता येतो आणि इतर गुंतवणुकीला धक्का लागत नाही.
वाचा - पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
या व्यक्तीची कहाणी हे सिद्ध करते की, फक्त जास्त पगार नाही, तर शिस्तबद्ध गुंतवणूक आणि योग्य आर्थिक निर्णय तुम्हाला करोडपती बनवू शकतात.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)