deepfake scam : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पीएम मोदी एका गुंतवणूक योजनेचा प्रचार करताना दिसत आहेत. या योजनेत फक्त २१,००० रुपये गुंतवून दररोज १.२५ लाख रुपये कमावता येतात, असा दावा केला जात आहे. पण सावधान! हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून, तो एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, पंतप्रधान मोदी किंवा केंद्र सरकारचा अशा कोणत्याही योजनेशी किंवा व्यासपीठाशी कोणताही संबंध नाही.
व्हायरल व्हिडिओचे सत्य काय?प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, पंतप्रधान मोदी दररोज १.२५ लाख रुपये नफा देणाऱ्या गुंतवणूक योजनेबद्दल बोलत असल्याचा व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. लोकांना अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल चौकशी करण्याचे आवाहन PIB ने केले आहे.
आजकाल एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढला आहे. सायबर गुन्हेगार याच तंत्रांचा वापर करून लोकांचा विश्वास संपादन करतात. ते मोठे नेते आणि सरकारी संस्थांच्या नावाचा वापर करून लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे कोणत्याही गुंतवणूक योजनेत पैसे टाकण्यापूर्वी, त्याची विश्वासार्हता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डीपफेक म्हणजे काय?डीपफेक म्हणजे एक असे तंत्रज्ञान, ज्यात एआयचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा आवाज किंवा चेहरा इतका हुबेहूब कॉपी केला जातो की तो खरा वाटतो. एचडीएफसी बँकेच्या माहितीनुसार, डीपफेक वापरून स्कॅमर बँक अधिकारी, कंपनीचे मोठे अधिकारी किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचीही नक्कल करू शकतात. हे लोक तुम्हाला फोन किंवा व्हिडिओ कॉल करून बँकेचे व्यवहार तपासणे किंवा खात्याची माहिती मागणे यांसारखी खोटी कारणे सांगू शकतात. हे व्हिडिओ किंवा ऑडिओ इतके खरे वाटतात की लोक सहजपणे त्यांच्या जाळ्यात अडकतात.
बँकिंग क्षेत्रात डीपफेकचा वापर वेगाने वाढत आहे. स्कॅमर लोकांच्या बँक खात्याची माहिती मिळवण्यासाठी, अनधिकृत पैसे हस्तांतरित करण्यासाठी किंवा गोपनीय माहिती चोरण्यासाठी डीपफेक व्हिडिओ किंवा ऑडिओचा वापर करत आहेत.
एसबीआयनेही दिला होता इशारायापूर्वी, मे महिन्याच्या सुरुवातीला, स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील लोकांना डीपफेक घोटाळ्याबद्दल सावध केले होते. एसबीआयने त्यांच्या सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले होते की, "गुंतवणुकीची संधी देणाऱ्या व्यक्तीची ओळख नेहमी तपासा. कोणत्याही अनोळखी सल्ल्यापासून सावध रहा आणि गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी दुप्पट खात्री करा." ग्राहकांनी अज्ञात स्त्रोतांकडून ऑफर केलेल्या कोणत्याही गुंतवणूक योजनांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असे आवाहन एसबीआयने केले होते.
डीपफेक घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?
- स्रोत तपासा: कोणत्याही गुंतवणूक योजनेबद्दल माहिती मिळाल्यास, तिचा स्रोत तपासा. अधिकृत सरकारी वेबसाइट्स किंवा सोशल मीडिया हँडलवर जाऊन सत्यता पडताळा.
- अनोळखी कॉल्सपासून सावध रहा: बँक अधिकारी असल्याचे भासवून कोणी तुमच्या खात्याची माहिती किंवा ओटीपी मागत असेल, तर लगेच कॉल कट करा आणि थेट बँकेशी संपर्क साधा.
- PIB फॅक्ट चेकचा वापर करा: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही बातमीचे सत्य जाणून घेण्यासाठी PIB फॅक्ट चेकच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.
वाचा - अदानींनी नागपूरमधील बुडती कंपनी ४००० कोटींनी केली खरेदी; आता शेअर्स गेले दबावात, काय आहे कारण?
- तात्काळ कारवाई करा: जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फसवणुकीचे शिकार झाला आहात, तर त्वरित तुमच्या बँकेला कळवा आणि सायबर क्राइम हेल्पलाइनवर तक्रार दाखल करा.