Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हे' ६ सुवर्णनियम माहीत आहेत का? पैसा दुप्पट-तिप्पट करणारा फॉर्म्युला! जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 10:17 IST

कष्टानं कमावलेला पैसा नुसता बँकेत ठेवून वाढत नाही, तर तो योग्य ठिकाणी गुंतवावा लागतो. पण, गुंतवणूक नक्की कुठे आणि कशी करावी? आपला पैसा किती वर्षांत दुप्पट होईल? या प्रश्नांनी अनेकजण गोंधळलेले असतात.

कष्टानं कमावलेला पैसा नुसता बँकेत ठेवून वाढत नाही, तर तो योग्य ठिकाणी गुंतवावा लागतो. पण, गुंतवणूक नक्की कुठे आणि कशी करावी? आपला पैसा किती वर्षांत दुप्पट होईल? या प्रश्नांनी अनेकजण गोंधळलेले असतात. गुंतवणूकदारांचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी सहा 'टाइमलेस रुल' सांगितले आहेत, जे तुमची आर्थिक प्रगती वेगाने करू शकतात.

१. 'रूल ऑफ ७२

'तुमची गुंतवणूक किती वर्षांत दुप्पट होईल, हे या नियमाने समजते. ७२ या आकड्याला तुमच्या गुंतवणुकीवरील व्याजदराने भागा. उदा. जर तुम्हाला एफडीवर ७% व्याज मिळत असेल, तर ७२/७ = १०.३ वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील.

ऑनलाइन गेमिंग ॲप WinZo च्या अडचणीत वाढ; युझर्सच्या ७३४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा EDचा आरोप

२. 'रूल ऑफ ११४

'हा तिप्पटीचा फॉर्म्युला आहे. पैसे तिप्पट करायचे असतील, तर ११४ ला व्याजदरानं भागा. १२% परतावा देणाऱ्या फंडात तुमचे पैसे ११४/१२ या गणितानुसार ९.५ वर्षांत तिप्पट होतील. दीर्घकालीन नियोजन करताना अंदाज बांधण्यासाठी याचा फायदा होईल..

३. 'रूल ऑफ १४४

'हा चौपटचा फॉर्म्युला आहे. पैसे चौपट करायचे असतील, तर १४४ ला व्याजदराने भागा. १२% परतावा देणाऱ्या फंडात तुमचे पैसे १४४/१२ या गणितानुसार १२ वर्षांत चौपट होऊ शकतात. दीर्घकालीन गुंतवणूक योजनेत गुंतवणुकीसाठी याचा फायदा होतो.

४. 'रूल ऑफ ७०'

महागाईमुळे पैशांची खरेदीशक्ती किती वर्षांत अर्धी होईल, हे यावरून समजते. ७० ला महागाई दरानं भागा. जर महागाई ५% असेल, तर ७०/५= १४ वर्षांत आजच्या १० लाखांची किंमत ५ लाखांइतकीच उरेल. त्यामुळे जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांत गुंतवणूक करा.

५. '११० वजा वय'

तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी किती हिस्सा शेअर्समध्ये असावा, हे या नियमानं ठरवता येतं. ११० मधून तुमचं वय वजा करा. उदा. तुमचं वय ३० असेल, तर ११०-३० = ८०. म्हणजेच ८०% रक्कम शेअर्समध्ये आणि २०% रक्कम सुरक्षित पर्यायात (एफडी/सोने) गुंतवावी.

६. '३-६ चा नियम' काय आहे?

अचानक नोकरी जाणं किंवा वैद्यकीय आणीबाणीसाठी किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम नेहमी हाताशी ठेवा. जर तुमचा मासिक खर्च ५० हजार असेल, तर १.५ ते ३ लाख रुपये लिक्विड फंड किंवा बचत खात्यात असणं आवश्यक आहे.

सारांश : थोडक्यात सांगायचं तर, हे नियम गुंतवणुकीचा पाया आहेत. बाजारातील चढ-उतार आणि कर लक्षात घेऊन, शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं कठीण नाही. आजच आपल्या बचतीचे नियोजन करा आणि भविष्यातील गरजांसाठी सज्ज व्हा. 

टीप - हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

टॅग्स :गुंतवणूकपैसा