Join us

दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:46 IST

Adani-Ambani Deal: मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी आपल्या व्यवसाय वाढीसाठी करार केला आहे.

Adani-Ambani Deal: देशातील दोन दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात नेहमी व्यावसायिक स्पर्धा असल्याचे सांगितले जाते, मात्र आता हे दोघे दिग्गज पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. अंबानी यांच्या रिलायन्स बीपी मोबिलिटी आणि अदानी यांच्या अदानी टोटल गॅस लिमिटेड (एटीजीएल) यांच्यात एक करार झाला आहे. या अंतर्गत दोघेही आपली इंधनविक्री वाढवण्यार भर देतील.

दोन्ही कंपन्यांमध्ये काय करार झाला?या करारांतर्गत, एटीजीएलच्या काही पेट्रोल पंपांवर जिओ-बीपी ब्रँड पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे, एटीजीएलचे सीएनजी स्टेशन जिओ-बीपीच्या काही पेट्रोल पंपांवर बसवले जातील. यामुळे दोन्ही कंपन्यांच्या इंधन विक्रीत तर वाढ होईलच, शिवाय दोघांचा व्यवसाय वाढेल आणि त्याचा सामान्य माणसालाही फायदा होईल. यामुळे ग्राहकांना एकाच कंपनीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळतील. 

या भागीदारीअंतर्गत, दोन्ही कंपन्यांचे पेट्रोल पंप तसेच येणाऱ्या काळात उभारण्यात येणाऱ्या आउटलेटचाही समावेश असेल. Jio-bp चे देशभरात एकूण १,९७२ पेट्रोल पंप आहेत, तर ATGL चे ६५० CNG स्टेशन आहेत. हे सर्व कव्हर केले जातील.

दुसऱ्यांदा केली भागीदारीअलीकडच्या काळात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा दोन उद्योगपती एकत्र व्यवसाय करण्यासाठी पुढे आले आहेत. या वर्षी मार्चमध्ये दोघेही मध्य प्रदेशात वीज प्रकल्पासाठी एकत्र आले. या अंतर्गत, रिलायन्स इंडस्ट्रीजने मध्य प्रदेशातील अदानी पॉवरच्या वीज प्रकल्पात २६ टक्के हिस्सा खरेदी केला होता.

दोघेही एकमेकांच्या मार्गात नाहीतअंबानींचा व्यवसाय तेल आणि वायूपासून ते किरकोळ विक्री आणि दूरसंचारपर्यंत आहेत. तर, अदानींचे लक्ष बंदरांपासून विमानतळ, कोळसा आणि खाणकामापर्यंत आहे. दोन्ही उद्योगपतींनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. अदानी अक्षय ऊर्जा मेगा पार्क बांधत आहे, ज्यात सौर मॉड्यूल आणि पवन टर्बाइनच्या निर्मितीचा समावेश आहे. तर,  रिलायन्स गुजरातमधील जामनगरमध्ये सौर पॅनेल, बॅटरी, ग्रीन हायड्रोजन आणि इंधन सेलसाठी चार गिगाफॅक्टरीज बांधत आहे.

टॅग्स :गौतम अदानीमुकेश अंबानीरिलायन्सअदानीगुंतवणूक