Join us

Zomato च्या शेअरमध्ये भूकंप, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹४४,६०० कोटी स्वाहा; आता पुढे काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:00 IST

Zomato Share Crash: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

Zomato Share Crash: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. निराशाजनक तिमाही निकालानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळेच गेल्या तीन दिवसांपासून त्यात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. तीन दिवसांच्या विक्रीदरम्यान झोमॅटोचे मार्केट कॅप ४४,६२० कोटी रुपयांनी घटलं. बुधवारी ते २,०१,८८५ कोटी रुपयांपर्यंत घसरलं. आजही कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक घसरले आणि २०३.८० रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर आले.

का होतेय घसरण?

डिसेंबर तिमाहीच्या खराब निकालांमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत झोमॅटोच्या नफ्यात घट झाली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा कमी होऊन ५९ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत १३८ कोटी रुपये होता. म्हणजेच निव्वळ नफ्यात ५७.२५ टक्क्यांची मोठी घसरण झाली. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या कामकाजातून मिळणारं उत्पन्न ६४.३९ टक्क्यांनी वाढून ५,४०५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

याशिवाय शेअर मध्ये घसरण होण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे फूड डिलिव्हरी व्यवसायाची कमी झालेली ग्रोथ. वास्तविक, झोमॅटोच्या ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूमध्ये डिसेंबर तिमाहीत केवळ २% वाढ झाली आहे, जी अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. दुसरीकडे, झोमॅटोनं ब्लिंकिटसाठी आक्रमक स्टोअर विस्ताराची योजना आखली आहे, ज्यामुळे गुंतवणुकीचा खर्च वाढलाय. क्विक कॉमर्स व्यवसायाचा तोटा वाढला आणि तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण निव्वळ नफा कमी झाला. यामुळेच गुंतवणूकदारांचा विश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. 

गुंतवणूकदारांनी काय करावं?

ब्रोकरेज कंपन्यांची या शेअरबाबत वेगवेगळी मते आहेत. काहींनी गुंतवणूकदारांना २१०-२०० रुपयांच्या आसपास खरेदी सुरू करण्याचा सल्ला दिला. तर काहींचं मत आहे की सध्या केवळ उच्च जोखीम असलेले गुंतवणूकदारच यात गुंतवणूक कायम ठेवू शकतात. नाहीतर यातून बाहेर पडणं चांगलं आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शियलनं झोमॅटोबाबत आपली सकारात्मक भूमिका कायम ठेवली असून अपेक्षित टार्गेट प्राईज २८० रुपये ठेवलीये. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, जर तुमच्याकडे शेअर्सची संख्या जास्त असेल तर टप्प्याटप्प्याने ते सरासरी २१०-२०० रुपयांच्या आसपास ठेवा. सध्याच्या बाजारभावात नव्या पद्धतीनं एन्ट्री घेऊ नका. दुसरीकडे, वेल्थमिल्स सिक्युरिटीजचा असा विश्वास आहे की जोखीम घेण्याची जास्त क्षमता असलेले गुंतवणूकदार स्टॉक कायम ठेवण्याचा विचार करू शकतात.

दुसरीकडे ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनने झोमॅटोच्या शेअरवर 'आउटपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवलं असून टार्गेट प्राइस ३१० रुपये ठेवण्यात आली आहे. इतर ब्रोकरेज कंपन्यांमध्ये सीएलएसएनं झोमॅटोच्या शेअरवर ४०० रुपये, बोफा सिक्युरिटीजनं ३७५ रुपये आणि नोमुरा इंडियाने २९० रुपयांचं टार्गेट देत खरेदीचा सल्ला दिलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजारगुंतवणूक