Join us

Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 13:34 IST

जाणून घ्या काय म्हटलंय ब्रोकरेजनं आणि कशी आहे सध्याची शेअर्सची स्थिती.

Zomato - Jio Financial Shares : ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलनं नुकताच आपला एक रिपोर्ट सादर केला. यामध्ये त्यांनी झोमॅटो आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस निफ्टी ५० निर्देशांकात सामील होण्याची शक्यता आता लक्षणीय वाढल्याचं म्हटलंय. या दोन्ही कंपन्या अलीकडेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) सेगमेंटमध्ये सामील झाल्या आहेत, जी निफ्टी ५० मध्ये स्थान मिळविण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे.

मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या निफ्टी निर्देशांकाच्या अपडेटदरम्यान या कंपन्यांचा निफ्टी ५० मध्ये समावेश होऊ शकतो. जेएम फायनान्शिअलच्या म्हणण्यानुसारएफ अँड ओ सेगमेंटमध्ये सामील झाल्यानंतर झोमॅटो आणि जिओ फायनान्शियलसाठी निफ्टीमध्ये सामील होण्याची शक्यता आणखी मजबूत झाली आहे.

... तर मोठी गुंतवणूक अपेक्षित 

झोमॅटो निफ्टी ५० मध्ये सामील झाल्यानंतर म्युच्युअल फंडातून सुमारे ५,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जवळपास ३,१४० कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. या दोन्ही कंपन्यांमध्ये एकूण ८,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, जे कंपनीच्या शेअरधारकांसाठी सकारात्मक ठरू शकते.

हे शेअर्स बाहेर पडू शकतात

याउलट बीपीसीएल आणि आयशर मोटर्सचे शेअर्स निफ्टी ५० निर्देशांकातून बाहेर पडू शकतात, असं जेएम फायनान्शिअलचं मत आहे. या कंपन्यांच्या शेअर्समधून अनुक्रमे १,८८२ कोटी आणि २,०१७ कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर जाऊ शकते.

बाजारातील कामगिरी

झोमॅटोचा शेअर १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सुमारे ४ टक्क्यांनी वधारून २६९.७१ रुपयांच्या पातळीवर पोहोचला, जो या वर्षी आतापर्यंत ११६ टक्क्यांनी वधारला आहे. जिओ फायनान्शियलचा शेअर ६ टक्क्यांनी वधारून ३१९.६० रुपयांवर बंद झाला असून या वर्षी आतापर्यंत त्याच्या शेअर्सनी ३६ टक्के परतावा दिला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकझोमॅटोजिओ