Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही सोशल मीडियावर टाइमपास करता अन् ‘ते’ होतात लखपती! किती मिळतो पैसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 10:33 IST

सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून काही नव्या संकल्पना आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत.

नवी दिल्ली : सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून काही नव्या संकल्पना आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे यूट्युबर्स. अनेक यूट्युबर्सची नावे तुम्हाला ठाऊक असतील. त्यांच्या कमाईचे आकडेही तुमच्या कानावर पडले असतील. अनेकांनी महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत, काहींनी आलिशान घरे बांधली आहेत. ते व्हिडीओ बनवून यूट्युबवर पोस्ट करतात, आपण पाहतो अन् त्यांना त्यातून बक्कळ कमाई मिळते, यामागचे गणित अनेकांना ठाऊक नसते. चला समजून घेऊ त्यांची कमाई नक्की कशी होते याबाबत.

महिलांनो आता डब्यात नको थेट पोस्टातच साठवा पैसे, मिळतोय मोठा परतावा

व्ह्युजमागे मिळतात सरासरी किती पैसे?

व्ह्यूज          कमाई

१ हजार ४२ रुपये       

२ हजार ८५ रुपये       

१० हजार       ३९० रुपये

१ लाख  ४,३८२ रुपये

१० लाख ४२,३५० रुपये

१ कोटी  ४.२१ लाख रुपये

१० कोटी ४२.३३ लाख रुपये 

१०० अब्ज      ४.२३ कोटी रुपये

कोणत्या नियमांचे बंधन?

यूट्युबवर केवळ लाखो फॉलोअर्स असून चालत नाही. त्यांनी तुमचे व्हिडीओ पाहणे आवश्यक असते. कोणत्याही अवैध, बेकायदा विषयावर व्हिडीओ बनविता येत नाहीत. यासाठी यूट्युबने काही नियम घालून दिले आहेत. आक्षेपार्ह व्हिडीओ कंपनी डिलीट करू शकते. व्हिडीओमध्ये कोणतीही अवैध, गुन्हेगारी कृत्य केले असेल तर सायबर पोलिसांकडून कारवाई केली जाऊ शकते.

तुम्ही जाहिरात स्किप केल्यास?

केवळ यूट्युवर व्हिडीओ पोस्ट केल्याने व तो अनेकांना पाहिल्यानेही कमाई मिळत नाही. या व्हिडीओवरील जाहिरातींमधून यूट्युबला कमाई मिळत असते. यातील काही भाग यूट्युब पोस्ट करणाऱ्याला देत असते. जितक्या वेळेस हा पाहिला जातो तितक्या वेळेस व्यूव्ह आणि पर्यायाने कमाई वाढत असते.

तुमचा व्हिडीओ १० हजार जणांनी पाहिला; परंतु आलेली जाहिरात स्किप केली असेल तर कंपनीला काहीही पैसे मिळत नाहीत; परंतु एक हजारजणांनी व्हिडीओ जाहिरातींसह पाहिल्यास पैसे दिले जातात. जाहिरातींसाठी अधिक पैसे घेतले असतील तर यूट्युबरलाही जादा वाटा मिळतो.

टॅग्स :यु ट्यूबसोशल मीडिया