Join us

अबब... २०२१ मध्ये भारताने खरेदी केले ६११ टन साेने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 07:53 IST

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अहवाल प्रसिद्ध, सोने खरेदीत ग्रामीण भारत अग्रेसर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात अर्थचक्र मंदावले असले तरी भारतीयांची सोन्याची हौस मात्र तसूभरही कमी झाली नव्हती. २०२१ या वर्षात भारताने तब्बल ६११ टन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली असून, सोने खरेदीमध्ये भारताने जगात दुसरा क्रमांक गाठल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालातून पुढे आली आहे. २०२१ या वर्षात चीनने ६७३ टन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करत पहिला क्रमांक पटकावला, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

लग्नासाठी दमदार खरेदी

देशांतर्गत लग्नासाठी खरेदी होणाऱ्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. देशात एकूण दागिने विक्रीपैकी ५५ टक्के दागिने हे लग्नासाठी खरेदी केल्याचे दिसते. तर २२ कॅरेट सोन्याच्या साध्याशा दागिन्यांची बाजारातील हिस्सेदारी ८० टक्क्यांवर आहे. रोजच्या रोज वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांनादेखील मोठी मागणी असून, त्यांची हिस्सेदारी ४५ टक्क्यांच्या आसपास आहे.

५८%  सोन्याची खरेदी ही ग्रामीण भागातून झाल्याचे दिसते. 

४०% सोने खरेदी दक्षिण भारतात झाली आहे.

अनेक नवीन ट्रेंड रुजण्यास सुरुवात

  • प्रथमच भारतीय कारागिरांनी बनविलेल्या सोन्याच्या दागिन्यांना अमेरिकेत सर्वात जास्त मागणी असल्याचे दिसून आले. 
  • आजवर भारतात बनणाऱ्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी ही यूएईमध्ये होती. मात्र, अमेरिकेने यूएईलादेखील मागे टाकले आहे. 
  • २०१९च्या वर्षात १२ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याचे दागिने भारताने निर्यात केले आहेत. 
  • भारतीय दागिन्यांना प्रामुख्याने अमेरिका, यूएई, हाॅंगकाॅंग, सिंगापूर आणि यूके या देशांतून मोठी मागणी आहे. 
टॅग्स :सोनंभारत