Join us

विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:05 IST

GST on Health Insurance Premium : जीएसटी कपातीनंतर आरोग्य विमा स्वस्त होईल, अशी आशा सर्वसामान्यांना आहे. प्रत्यक्षात विमा कंपन्या ५% दर वाढवण्याचा विचार करत आहेत.

GST on Health Insurance Premium : देशामधील लाखो नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीच्या प्रीमियमवर लागणारा १८ टक्के जीएसटी रद्द करण्यात आला आहे. यामुळे विमा स्वस्त होण्याची अपेक्षा होती. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात विमा स्वस्त होईल का? यावर प्रश्नचिन्ह आहे.

नुकत्याच आलेल्या एका नव्या अहवालाने लोकांच्या या अपेक्षेवर पाणी फिरवले आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज रिसर्चच्या एका नवीन रिपोर्टनुसार, विमा कंपन्या इनपुट टॅक्स क्रेडिटमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी त्यांचे टॅरिफ ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहेत. यामुळे, प्रीमियम कमी होण्याऐवजी वाढू शकतो.

कंपन्या खर्च का वाढवणार?रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, टॅरिफ वाढवल्यामुळे कंपन्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यास मदत मिळेल. पूर्वी, विमा कंपन्या एजंटचे कमिशन, पुनर्विमा आणि जाहिरातींवर होणाऱ्या त्यांच्या ऑपरेशनल खर्चावर मिळणाऱ्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेत होत्या. आता जीएसटी हटवल्यामुळे कंपन्यांना हा ITC क्लेम करता येणार नाही. यामुळे त्यांचा खर्च वाढेल, आणि तो संतुलित करण्यासाठी त्यांना टॅरिफचा आधार घ्यावा लागेल. म्हणजे, पॉलिसीचे दर वाढवले जातील.

सोप्या भाषेत सांगायचे तर, आधी जीएसटी प्रणालीमध्ये कंपन्यांना त्यांच्या खर्चावर दिलेला कर ग्राहकांकडून घेतलेल्या जीएसटीमधून वजा करण्याची खास सुविधा होती. त्यामुळे कंपन्यांवर कराचा जास्त बोजा पडत नव्हता. पण आता जीएसटीच नसल्याने हा हिशोब बिघडणार आहे. तो संतुलित करण्यासाठी कंपन्या प्रीमियमचे दर वाढवू शकतात, जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही.

पॉलिसी घेणाऱ्यांची मागणी वाढेल, पण फायदा किती?हा बदल २२ सप्टेंबर, २०२५ पासून लागू होणार आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, जीएसटी रद्द झाल्याने विमा प्रीमियम १२-१५ टक्क्यांनी स्वस्त होण्याची शक्यता असल्यामुळे त्याची मागणी वाढेल. मात्र, प्रीमियम वाढल्यास जीएसटीमधील सवलतीचा काय फायदा मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

वाचा - UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! १५ सप्टेंबरपासून वाढणार 'या' व्यवहारांची मर्यादा, जाणून घ्या नवे नियम

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या रिपोर्टनुसार, जीएसटीवरील सवलत आणि ITC चा फायदा संपल्यानंतर स्टार हेल्थ आपल्या टॅरिफमध्ये १-३ टक्के, तर निवा बूपा सुमारे ४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे, पॉलिसीधारकांना विमा पॉलिसीवरील जीएसटी दर कपातीचा फारसा परिणाम दिसणार नाही.

टॅग्स :जीएसटीमुख्य जीएसटी कार्यालयहेल्थ टिप्सआरोग्य