Why Stock market Crash Today: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव, रुपयाचं घसरतं मूल्य आणि इतर जागतिक कारणांमुळे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. बीएसई चा ३० शेअर्सचा निर्देशांक 'सेन्सेक्स' १८०० हून अधिक अंकांनी कोसळला, तर एनएसई (NSE) चा 'निफ्टी' २२,५५० च्या महत्त्वपूर्ण पातळीच्या खाली आला आहे. सेन्सेक्स १८०३ अंकांनी घसरून ७२,७८४ वर, तर निफ्टी २२,५३८ वर पोहोचला. या वेगवान विक्रीमुळे बीएसईमध्ये लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपमधून सुमारे ११ लाख कोटी रुपये स्वाहा झाले असून ते ४१८ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलं आहे.
टॅक्स फ्री इन्कम: 'या' सरकारी स्कीम्समध्ये गुंतवणूकीवर १ रुपयाही टॅक्स नाही, चेक करा डिटेल्स
बाजार कोसळण्यामागची ४ प्रमुख कारणं
१. अमेरिका-इराण युद्धामुळे वाढलेला जागतिक तणाव:
अमेरिका आणि इराणमधील वाढता संघर्ष बाजारासाठी सर्वात मोठी जोखीम ठरत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला की, जर 'होर्मुजची सामुद्रधुनी' उघडली नाही, तर त्यांच्या ऊर्जा तळांवर हल्ला केला जाईल. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही ती पूर्णपणे बंद करण्याची धमकी दिली आहे. या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा बाजारावर धोका निर्माण झाला असून गुंतवणूकदारांमध्ये भीती वाढली आहे.
२. रुपयाचा ऐतिहासिक नीचांक:
भारतीय रुपयावर सातत्याने दबाव असून सोमवारी तो प्रति डॉलर ९३.८९ या विक्रमी नीचांकी स्तरावर पोहोचला. कमकुवत रुपयामुळे विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतातील गुंतवणूक कमी आकर्षक ठरते, ज्यामुळे भांडवल काढलं जातं आणि बाजारावर दबाव येतो. तसंच, आयात महागल्याने महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो.
३. कच्च्या तेलाच्या किमती ही मोठी चिंता:
ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ११० डॉलरच्या वर कायम आहे, जी भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशासाठी चिंतेची बाब आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढते, चालू खात्यातील तूट वाढते आणि कंपन्यांचा नफा कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, जर तेल दीर्घकाळ महाग राहिले तर भारताच्या जीडीपी वाढीवरही परिणाम होऊ शकतो.
४. विदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री:
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) बाजारात मोठी विक्री केली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे १ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. एकट्या मार्च महिन्यातच ८६,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेण्यात आली आहे. या सततच्या विक्रीमुळे बाजार अधिक कमकुवत झाला आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावं?
जोपर्यंत युद्धाचा तणाव कमी होत नाही, तेलाच्या किमती स्थिर होत नाहीत आणि रुपया मजबूत होत नाही, तोपर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहू शकते. अशा वेळी गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेणं टाळावं. भक्कम पाया असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करावं आणि दीर्घकालीन रणनीतीचा अवलंब करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
Web Summary : Indian stock market crashes due to US-Iran tensions, weak rupee, and rising oil prices. Investors lost ₹11 lakh crore as Sensex and Nifty plummeted, fueled by foreign investor sell-offs. Experts advise long-term strategies.
Web Summary : अमेरिकी-ईरान तनाव, कमजोर रुपया और बढ़ते तेल की कीमतों के कारण भारतीय शेयर बाजार में गिरावट आई। विदेशी निवेशकों की बिकवाली से सेंसेक्स और निफ्टी में गिरावट आई, निवेशकों को ₹11 लाख करोड़ का नुकसान हुआ। विशेषज्ञों ने दीर्घकालिक रणनीतियों की सलाह दी है।