moonlighting job : सध्या अमेरिकेत एक भारतीय अभियंता चर्चेचा विषय बनला आहे. सोहम पारेख नावाच्या या अभियंत्याने एकाच वेळी अनेक ठिकाणी काम करून दररोज सुमारे अडीच लाख रुपये कमावल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या 'मूनलाइटिंग' या संकल्पनेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.
सोहम पारेख कोण आहे?सोहम पारेख हा मुंबई विद्यापीठातून पदवीधर आहे. जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्याच्या बायोडाटानुसार, त्याने डायनामो एआय, युनियन एआय, ॲलन एआय आणि सिंथेसियासह अनेक मोठ्या टेक कंपन्यांमध्ये काम केले आहे.
कसे उघड झाले हे प्रकरण?मिक्सपॅनेलचे सह-संस्थापक सुहेल दोशी यांनी सर्वात आधी सोशल मीडियावर सोहम पारेखचे हे प्रकरण उघड केले. त्यानंतर एआय (AI) गुंतवणूकदार डीडी दास यांनीही यावर भाष्य केले, ज्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आले.
'मूनलाइटिंग' म्हणजे काय?'मूनलाइटिंग' म्हणजे, आपल्या मुख्य कंपनीला माहिती न देता एकाच वेळी एकापेक्षा जास्त ठिकाणी काम करणे. डीडी दास यांच्या मते, असे लोक स्वतःला "ओवर-एम्प्लॉयड" म्हणतात. हे लोक काम करत असल्यासारखे दिसण्यासाठी 'माऊस जगलर' (Mouse Juggler) सारख्या उपकरणांचा वापर करतात. ते कॅमेरा बंद ठेवतात, कॅलेंडरमध्ये 'फोकस टाइम' ब्लॉक करतात आणि कधीकधी त्यांचे काम इतरांकडून करून घेतात. ते वेगाने काम करतात, पण संशय येऊ नये म्हणून ते काम सावकाश पूर्ण झाल्यासारखे दाखवतात.
लिंक्डइनवरही वादविवादडीडी दास यांच्या या पोस्टवर लिंक्डइनवर अनेकांनी आपली मते व्यक्त केली. काहींनी म्हटले की, नोकरीची भूमिका नीट न समजून लोकांना भरती करणाऱ्या कंपन्यांची चूक आहे. तर काहींनी युक्तिवाद केला की, एआयमुळे काम १० पट वेगाने होत असल्याने लोकांना कमी वेळेत जास्त काम करणे शक्य झाले आहे, पण पगार तोच असल्याने लोक असे करत आहेत.
५ नोकऱ्या आणि वार्षिक ६.८५ कोटींची कमाईडीडी दास यांनी एका रेडिट वापरकर्त्याची गोष्ट शेअर केली, ज्याची ओळख नंतर सोहम पारेख म्हणून पटली. या रेडिट वापरकर्त्याने सांगितले होते की, तो एकाच वेळी ५ नोकऱ्या करत असून वर्षाला सुमारे ६.८५ कोटी रुपये कमवत आहे. तो म्हणाला की तो ऑफिसला जात नाही आणि बहुतेक बैठका टाळतो. तो स्वतःला सल्लागार म्हणवून वेळ मारून नेतो आणि मुलाखतींमध्ये खोटे बोलून एआयशी खेळ खेळत असल्याचेही त्याने सांगितले. त्याचे लक्ष केवळ कमी वेळेत जास्त पैसे कमावण्यावर होते.
प्रतिभावान पण फसवणुकीचा आरोपसोहम पारेखला एक अत्यंत प्रतिभावान आणि हुशार अभियंता म्हणून ओळखले जात होते, जो इतरांना तीन तास लागणारे काम एका तासात पूर्ण करू शकत होता. मुलाखतींमध्ये तो खूप चांगला अभिनय करायचा, ज्यामुळे कंपन्या त्याला आत्मविश्वासाने कामावर ठेवत असत. पण आरोपांनुसार, सोहमने या प्रतिभेचा गैरवापर केला आणि एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये पूर्णवेळ काम केले. अनेकदा तो इतरांकडून काम करून घ्यायचा किंवा कामाकडे दुर्लक्ष करायचा.
वाचा - ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
सोहमचे नाव डायनामो एआय, युनियन एआय, सिंथेसिया, ॲलन एआय, अँटीमेटल, फ्लीट एआय आणि मोजॅक यांसारख्या अनेक नामांकित स्टार्टअप्सशी जोडले गेले आहे. अँटीमेटलचे सीईओ मॅथ्यू पार्कहर्स्ट आणि वॉर्पचे उत्पादन प्रमुख मिशेल लिम यांनीही सोहमला कामावर ठेवल्याचे कबूल केले आहे.
या प्रकरणामुळे कॉर्पोरेट जगतात 'मूनलाइटिंग' आणि कर्मचाऱ्यांच्या निष्ठेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.