Perplexity Arvind Srinivas : काही महिन्यांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. एआय मॉडेल विकसित करणाऱ्या कंपन्याही यातून मालामाल होत आहे. याचं एक ताजं उदाहरण समोर आलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप पर्प्लेक्सिटीने (Perplexity) गुगलचा प्रसिद्ध वेब ब्राउझर क्रोम खरेदी करण्यासाठी सुमारे ३४.५ अब्ज डॉलर (अंदाजे ३ लाख कोटी रुपये) ची मोठी बोली लावली आहे. गुगलने अजून तरी क्रोम विकण्याची इच्छा दाखवलेली नाही, पण या बोलीमुळे पर्प्लेक्सिटी आणि त्याचे भारतीय वंशाचे सीईओ अरविंद श्रीनिवास हे जगभरात चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे, अरविंद श्रीनिवास यांच्या कंपनीचे सध्याचे मूल्यांकन केवळ १८ अब्ज डॉलर्स आहे, तरीही त्यांनी गुगलला दुप्पटपेक्षा जास्त किंमत ऑफर केली आहे.
कोण आहेत अरविंद श्रीनिवास?७ जून १९९४ रोजी चेन्नई येथे जन्मलेल्या अरविंद यांनी बालपणापासूनच तंत्रज्ञान आणि गणितात आपली हुशारी दाखवली. त्यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक आणि एम.टेक केले. त्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी पूर्ण केली. त्यांचे संशोधन मशीन लर्निंग आणि एआयवर आधारित होते.अरविंद यांनी एआयच्या जगातील २ मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. यात OpenAI मध्ये इंटर्नशिप आणि नंतर संशोधन शास्त्रज्ञ म्हणून काम केले. तसेच, गुगलमध्ये त्यांनी व्हिजन ट्रान्सफॉर्मर मॉडेल्सवर काम करून आपला अनुभव वाढवला.
पर्प्लेक्सिटी AI ची स्थापनाअरविंद श्रीनिवास यांनी २०२२ मध्ये अँडी कोनविन्स्की, डेनिस याराट्स आणि जॉनी हो यांच्यासोबत मिळून पर्प्लेक्सिटी AI ची स्थापना केली. हे एक AI-आधारित सर्च इंजिन आहे, जे पारंपरिक सर्च इंजिनला टक्कर देत आहे.पर्प्लेक्सिटीने अल्पावधीतच मोठी प्रगती केली आहे. जेफ बेझोस आणि एनव्हिडिया (NVIDIA) सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी यात पैसे गुंतवले आहेत. २०२४ पर्यंत कंपनीचे मूल्यांकन १४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले होते आणि आता ते अंदाजे १८ अब्ज डॉलर्स आहे.कंपनीने नुकतेच कॉमेट नावाचा स्वतःचा एआय-आधारित ब्राउझरही लाँच केला आहे.
अरविंद श्रीनिवास यांची संपत्ती२०२५ च्या अंदाजानुसार, अरविंद श्रीनिवास यांची एकूण संपत्ती सुमारे २.२३ अब्ज ते २.६९ अब्ज डॉलर (२२३.८ कोटी ते २६९.३ कोटी) आहे. पर्प्लेक्सिटी ही त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. ते एक यशस्वी एंजल गुंतवणूकदारही आहेत, ज्यांनी एआय आणि हाय-टेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एक युनिकॉर्न कंपनीही आहे.
वाचा - HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड! पर्प्लेक्सिटीने वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितले आहे की, क्रोम खरेदीसाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी उभा करण्यासाठी मोठे गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल फंड तयार आहेत. क्रोमचे बाजार मूल्य २० अब्ज ते ५० अब्ज डॉलर दरम्यान असण्याचा अंदाज आहे. अरविंद श्रीनिवास यांच्या या धाडसी निर्णयामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.