NSE IPO: जर तुम्ही भारतातील सर्वात मोठे शेअर बाजार नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) आयपीओची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एनएसईच्या आयपीओसाठी कोणताही अडथळा येणार नाही, असं बाजार नियामक सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी सांगितलं. दिवाळीपूर्वी आयपीओ येण्याच्या शक्यतेबाबत विचारलं असता सेबीच्या प्रमुखांनी कोणतीही कालमर्यादा सांगण्यास नकार दिला.
सेबी प्रमुख काय म्हणाले?
एनएसईच्या आयपीओच्या बाबतीत कोणताही अडथळा येणार नाही असं त्यांनी सांगितलं. पांडे यांनी पुन्हा सांगितले की सेबी शेअर बाजारांना क्लिअरिंग कॉर्पोरेशनची मालकी असण्यावर सहमत आहे आणि ही मालकी एनएसईच्या आयपीओच्या शर्यतीत अडथळा नाही. क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या मालकीच्या बाबतीत प्रत्येक देशाचं स्वतःचं मॉडेल असतं. अमेरिकेत ब्रोकर्स त्याचे मालक तर भारतात ते स्वतंत्र युनिट म्हणून काम करतात.
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या प्रयत्नात
एनएसई काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्यामध्ये काही रक्कम भरणं आणि काही प्रकरणं मागे घेणं समाविष्ट आहे, असं पांडे म्हणाले. दरम्यान, त्यांनी सेटलमेंटचं नेमकं स्वरूप आणि करायच्या पेमेंटबद्दल अधिक माहिती दिली नाही.
५ वर्षांचा प्लान
सेबी व्यवहाराच्या त्याच दिवशी सेटलमेंटसाठीची मुदत वाढवत नाही कारण त्यात विशेषतः परदेशी गुंतवणूकदारांशी संबंधित गुंतागुंतीचा समावेश असल्याचं ते म्हणाले. त्यांनी सुचवलं की ही एक पर्यायी सुविधा राहील. पुढील पाच वर्षांत भांडवली बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांची एकूण संख्या सध्याच्या १३ कोटींवरून ४० कोटींपर्यंत वाढवण्याचं आपण ध्येय ठेवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.