Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त एका कारणामुळे आंबा उत्पादकांना बसणार ५०० कोटींचा फटका! लोणच्यासाठी विकण्याची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:30 IST

Mango Farmer Loss : यावर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलांमुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आधीच नुकसान होऊ लागले आहे. यामुळे निर्यातीलाही मोठा धक्का बसू शकतो.

Mango Farmer Loss : यंदा १६ दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात आंबा उत्पादक शेतकरी विशेष करुन भरडले आहेत. देशात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र सर्वाधिक आंब्याचे उत्पादन घेतो. हे आंबे फक्त देशच नाही तर विदेशातही निर्यात केले जातात. मात्र, यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारतातून आलेले ४ कोटी रुपयांचे आंबे नष्ट केले. यातही व्यापारी आणि शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला.

कोकणातील हापूसलाही मोठा फटका!कोकण प्रदेश, जो जगाला उत्कृष्ट हापूस आंब्याचा पुरवठा करतो, तिथे यावर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे आंब्याच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. झाडांवर आंबे पिकण्यापूर्वीच ते गळून पडले किंवा खराब झाले. पीक नुकसानीच्या भीतीने, बहुतेक शेतकऱ्यांनी पिकण्यापूर्वीच आपले आंबे काढून घेतले. याचा परिणाम असा झाला की, हे आंबे लोणचे बनवण्यासाठी कमी किमतीत विकावे लागले, ज्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.

गेल्या काही दिवसांत कोकणात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे अनेक आंबा बागांना मोठा फटका बसला आहे. आंबे झाडावरून गळून पडले, तर काही ठिकाणी झाडांनाच नुकसान झाले. हापूसचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी होऊन दरांवर परिणाम होण्याची भीती आहे.

उत्तर प्रदेशातही 'आंब्यावर' संकट!महाराष्ट्रासोबतच, देशातील सर्वात मोठे आंबा उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही आंब्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. देशातील २५ टक्क्यांहून अधिक आंब्याचे उत्पादन एकट्या उत्तर प्रदेशात होते. पण वाणिज्य मंत्रालयाच्या मते, अवकाळी पाऊस आणि वादळामुळे आंबा पिकावर मोठा परिणाम होत आहे. मे आणि जून हे आंबे पिकण्याचे महत्त्वाचे महिने असतात, आणि याच काळात हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

सहारनपूरमध्ये नुकत्याच आलेल्या एका जोरदार वादळामुळे अनेक आंब्याची झाडे तर उन्मळून पडलीच, पण त्यावरील आंब्याचे पीकही पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जमिनीवर कोसळले. वादळाचा सामना करूनही झाडांना चिकटून राहिलेल्या आंब्यावरही वेगाने बदलणाऱ्या तापमानाचा परिणाम दिसून येत आहे. दरवर्षी उत्तर प्रदेशातून कोट्यवधी रुपयांचे आंबे निर्यात केले जातात, परंतु यावर्षी एका पैशाच्याही किमतीचे आंबे निर्यात करता आले नाहीत, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.

पीक कमी होण्याचे कारण काय आहे?पीक शास्त्रज्ञांच्या मते, आंब्याचे पीक चांगले येण्यासाठी आणि आंबे पिकण्यासाठी २७ अंश किंवा त्याहून अधिक स्थिर तापमानाची आवश्यकता असते. पण, दरवर्षी मे महिन्यात येणारी तीव्र उष्णता यावर्षी कमी दिसून येत आहे. काही ठिकाणी पाऊस आणि काही ठिकाणी वादळामुळे तापमान सरासरीपेक्षा ४-५ अंशांनी कमी आहे. ही परिस्थिती आंबा उत्पादकांसाठी आपत्तीपेक्षा कमी नाही, कारण याचा उत्पादनावर थेट परिणाम होत आहे. बहुतेक शेतकऱ्यांचे ६० टक्के पीक चौंसा आणि दसरी या जातीतून येते आणि कमी तापमानामुळे या दोन्ही पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यांचे उत्पादन ५० टक्क्यांहून अधिक घटले आहे.

वाणिज्य मंत्रालयालाही चिंता!भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. देशात सुमारे १००० प्रकारच्या आंब्याचे उत्पादन घेतले जाते. कृषी आणि निर्यात प्रोत्साहन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने ३२ हजार टन आंब्याची निर्यात करून सुमारे ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. आखाती देशांव्यतिरिक्त, हे आंबे यूके आणि अमेरिकेतही पाठवले जात होते.

वाचा - बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?

यावर्षी मात्र शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने वाणिज्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. आंबा झाडावर चांगला पिकला तरच सरकारकडून मिळणारी मदतही उपयुक्त ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच, यंदाचा आंब्याचा हंगाम हवामानामुळे धोक्यात आला असून, याचा थेट परिणाम आंबा उत्पादक शेतकरी आणि आंबाप्रेमींवरही होणार आहे.

टॅग्स :आंबाउत्तर प्रदेशशेतकरीशेती क्षेत्र