Join us

व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:42 IST

US Vice President in India: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

US Vice President JD Vance india Visit:डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या सत्तेत पुनरागमन केल्यापासून सातत्याने मोठमोठे निर्णय घेत आहेत. यातील सर्वात मोठा निर्णय 'टॅरिफ' संदर्भातील आहे. अमेरिकेने अनेक देशांवर मनमानी कर लादल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे. या धक्क्यातून भारतही वाचू शकलेला नाही. अमेरिकेने भारतावरही 26 टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. सध्या हा कर लादण्याची तारीख पुढे ढकलली असली तरी, भविष्यात कर लादण्याची भीती आहेच. अशा परिस्थितीत ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स भारत दौऱ्यावर आले आहेत. 

टॅरिफ तणावादरम्यान जेडी व्हेन्स भारतातअमेरिका आणि चीनमधील 'टॅरिफ वॉर' आणि जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर जेडी व्हेन्सचा भारत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. विशेषतः भारताला याचा फायदा घेण्याची संधी आहे.

भारतासाठी चांगली संधी

या दौऱ्यात जेडी व्हेन्स भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आणि अर्थव्यवस्था, व्यापार आणि भू-राजकीय मुद्द्यांवर चर्चा करतील. चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ वॉर शिगेला पोहोचला आहे. चीनने 125% कर लादल्यानंतर अमेरिकेनेही चिनी आयातीवर 245% पर्यंत कर लादण्याची घोषणा केली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेला पर्याय शोधण्यासाठी पूर्व आशियाई देश व्हिएतनाम, मलेशिया आणि कंबोडियाला भेट देत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका भारताला चीनविरुद्ध भागीदार देश म्हणून पाहत आहे. 

इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेने भारतावर कमी कर लादला आहे, शिवाय 90 दिवसांचा वेळही दिला आहे. तसेच, संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि हवामान बदल यासारख्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमधील सहकार्य सतत वाढत आहे. एवढेच नाही, तर आशिया-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता अमेरिका भारतासोबतची आपली धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करू इच्छिते. अशा परिस्थितीत व्हेन्सचा दौरा अनेक प्रकारे महत्त्वाचा आहे.

अनेक मुद्द्यांवर चर्चाभारत दोन्ही देशांसाठी फायदेशीर मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करेल. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही टॅरिफचा प्रश्न संवादाद्वारे सोडवण्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळेच जेडी व्हेन्सची ही भेट भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. याशिवाय दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाईल. अनिवासी भारतीयांच्या मुद्द्यांवर भर दिला जाईल.  चीनसोबतच्या व्यापार युद्धादरम्यान अनेक अमेरिकन कंपन्या भारतात प्रवेश करण्याच्या संधी शोधत आहेत. या यादीत ट्रम्प यांचे मित्र इलॉन मस्क यांच्या टेस्लाचेही नाव आहे. जर भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय करार झाला, तर भारतासाठी वेगाने पुढे जाण्याची ही एक मोठी संधी असेल.

टॅग्स :अमेरिकाभारतडोनाल्ड ट्रम्पनरेंद्र मोदीव्यवसाय