Join us

सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:08 IST

UPI Cash Exchange Scam : सोशल मीडियावर मनी लाँड्रिंग घोटाळ्यांची चर्चा होत आहे. अनोळखी लोकांकडून पैसे घेऊन UPI पेमेंट करणे टाळा, त्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

UPI Cash Exchange Scam : यूपीआय पेमेंटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत एखाद्या अनोळखी व्यक्तीने 'तुम्हाला यूपीआय पेमेंट करतो, मला रोख रक्कम द्याल का? किंवा रोख रकमेच्या बदल्यात मला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करा' अशी मागणी केली तर ही तुम्हाला साधी मदत वाटू शकते, पण तुम्ही नकळत एका मोठ्या मनी लाँड्रिंग घोटाळ्यात अडकू शकता. यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. बाजारात सध्या या नवीन स्कॅमला अनेकजण बळी पडत आहेत.

सोशल मीडियावर चर्चासध्या सोशल मीडियावर अनेक चार्टर्ड अकाउंटंट या प्रकरणाबद्दल लोकांना जागरूक करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही एक सामान्य गोष्ट वाटत असली तरी, ही एक पूर्वनियोजित फसवणूक असू शकते. असे व्यवहार भविष्यात सरकार आणि बँकांकडून तपासले गेल्यास, तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता.

अनोळखी व्यक्तीला मदत करणे का धोकादायक?तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, काही लोक तुम्हाला रस्त्यावर थांबवून रोख पैशांच्या बदल्यात UPI पेमेंट करण्याची विनंती करतात. सुरुवातीला ही मदत लहान वाटते, पण इथूनच धोका सुरू होतो.

  • मनी लाँड्रिंग : हे पैसे अवैध मार्गाने कमावलेले असू शकतात, आणि त्यांचा मागमूस पुसण्यासाठी हे लोक सामान्य लोकांचा वापर करतात. तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्यामुळे तुम्ही या प्रकरणात भागीदार बनू शकता.
  • बँक खाते गोठवले जाऊ शकते : जर तुमच्या खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळले, तर पोलीस किंवा बँक तुमच्या व्यवहारांची चौकशी करू शकतात. अशा वेळी तुमचे बँक खाते गोठवले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या पैशांचा वापर करू शकणार नाही.
  • बनावट ओळख : फसवणूक करणारे अनेकदा बनावट ओळख वापरतात, ज्यामुळे त्यांना पकडणे कठीण होते आणि तुम्हीच अडचणीत येण्याची शक्यता वाढते.

यापासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?

  • अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका : सर्वात सोपा मार्ग म्हणजे रस्त्यावर किंवा सोशल मीडियावर अशा अनोळखी व्यक्तींना मदत करण्यास स्पष्ट नकार द्या.
  • बँक/एटीएमचा वापर करा : तुम्हाला रोख रकमेची गरज असल्यास, एटीएम किंवा बँकेतून पैसे काढा.
  • तात्काळ तक्रार करा : जर कोणी तुम्हाला अशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याची माहिती तात्काळ पोलीस किंवा सायबर सेलकडे द्या.

वाचा - LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट

अशा प्रकारे तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता आणि इतरांनाही या धोक्यापासून वाचवू शकता. थोडीशी सावधगिरी बाळगल्यास तुम्ही मोठा त्रास टाळू शकता.

टॅग्स :सायबर क्राइमऑनलाइनपे-टीएमगुगल पेगुन्हेगारी