NSE Stock Fraud ED Raid: सक्तवसूली संचालनालयानं (ED) मनी लाँड्रिंगच्या तपासाअंतर्गत मुंबई आणि चेन्नईमधील ८ ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती समोर आलीये. ही कारवाई NSE इंडिया लिमिटेडच्या कथित 'अनलिस्टेड' शेअर्सच्या विक्रीशी संबंधित असलेल्या एका गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी करण्यात आली. ईडीच्या मुख्यालय तपास युनिटनं २७ फेब्रुवारी रोजी हे छापे टाकल्याची माहिती दिली आहे.
या कंपन्या आणि व्यक्तींवर कारवाईचा बडगा
सीएनबीसी टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, ईडीच्या या कारवाईत ॲटम कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, ऑप्टिमस फायनान्शियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, बबली इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि सुप्रीमस एंजेल यांसारख्या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांचा समावेश आहे. तपासामध्ये सतीश कुमार, संजय दामानी, नीरज निसार, कृष वोहरा, मनीष सोनी आणि निशा कुमारी यांची नावे समोर आली आहेत. ईडीचा असा आरोप आहे की, या लोकांनी एका टोळीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना एक्सचेंज ऑपरेटरचे अनलिस्टेड शेअर्स देण्याचं आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली.
पेट्रोल-डिझेलची तुर्तास दरवाढ नाही; कॅनडावरुन LPG आयात करणार, सरकारकडून मोठा दिलासा
गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढण्याची पद्धत
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुंतवणूकदारांना आमिष दाखवत असत की त्यांच्याकडे NSE इंडिया लिमिटेडचे शेअर्स आहेत आणि ते खाजगी शेअर खरेदी कराराद्वारे प्रीमियमवर ते ट्रान्सफर करू शकतात. मात्र, तपासात असं दिसून आलं की, या समूहाकडे प्रत्यक्षात ते शेअर्स नव्हतेच ज्यांची ते विक्री करण्याचा दावा करत होते. NSE इंडिया लिमिटेडचे शेअर्स कोणत्याही स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड नसल्यामुळे त्यांचा व्यवहार NSE किंवा BSE सारख्या प्लॅटफॉर्मवर होत नाही.
खाजगी व्यवहारांचा फायदा घेऊन फसवणूक
आरोपींनी खाजगी व्यवहारांमधील औपचारिक देखरेखीच्या अभावाचा फायदा घेतला आणि गुंतवणूकदारांकडून आगाऊ पेमेंट म्हणून मोठी रक्कम वसूल केली, असा खुलासा ईडीच्या तपासात झाला आहे. गुंतवणूकदारांकडून गोळा केलेला हा पैसा अनेक बँक खात्यांद्वारे फिरवण्यात आला आणि नंतर त्याचं रूपांतर जंगम आणि स्थावर मालमत्तेत करण्यात आलं. छाप्यादरम्यान ईडीनं मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर साहित्य जप्त केलं आहे.
मालमत्ता जप्त आणि खाती गोठवली
ईडीनं सतीश कुमार, संजय दामानी आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांची अनेक बँक आणि डिमॅट खाती गोठवली आहेत. या खात्यांमध्ये गुन्ह्यातून मिळालेला पैसा असल्याचे पुरावे एजन्सीला मिळाले आहेत. विविध राज्यांतील गुंतवणूकदारांनी या योजनेविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत. विशेष म्हणजे, NSE च्या संभाव्य लिस्टिंगपूर्वी खाजगी बाजारात त्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांची आवड वाढत असतानाच हा घोटाळा समोर आला आहे.
NSE च्या IPO ची तयारी आणि वाढलेली मागणी
NSE चे प्रमुख अशोक कुमार चौहान यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एक्सचेंजला सेबीकडून IPO साठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळालं आहे आणि ते ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस तयार करत आहेत. IPO आणण्यासाठी सुमारे सात ते आठ महिने लागू शकतात आणि वर्षाच्या अखेरीस लिस्टिंग करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. बाजार तज्ज्ञांच्या मते, या बहुप्रतिक्षित IPO मुळे अनलिस्टेड मार्केटमध्ये एक्सचेंजच्या शेअर्सची मागणी वाढली आहे.
गुंतवणूकदारांनी सावध राहण्याचे आवाहन
तपासकर्त्यांचं म्हणणं आहे की, अशा प्रकारच्या मागणीमुळे बनावट मध्यस्थांना संधी मिळते. गुंतवणूकदारांनी शेअर्स विकणाऱ्याची मालकी डिमॅट रेकॉर्डवरून तपासून घ्यावी आणि ट्रान्सफर मान्यताप्राप्त डिपॉझिटरी सिस्टीमद्वारेच होत असल्याची खात्री करावी. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं ईडीनं म्हटलंय.
Web Summary : ED raids uncover NSE unlisted shares fraud in Mumbai, Chennai. Companies allegedly lured investors with false promises of premium shares, siphoning funds through multiple accounts. Assets frozen, investigation ongoing.
Web Summary : मुंबई, चेन्नईमध्ये एनएसईच्या अनलिस्टेड शेअर्समधील घोटाळा उघडकीस. प्रीमियम शेअर्सचे खोटे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केले, अनेक खात्यांमधून पैसे काढले. मालमत्ता जप्त, तपास सुरू.