Join us

अदानींना मोठा धक्का! सगळ्या कंपन्यांच्या शेअर्सची घसरण, एकाच दिवसात ८९५ अब्ज बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 20:23 IST

गौतम अदानींच्या सात कंपन्यांच्या शेअर्सची मोठी घसरण; टॉप ५ श्रीमंतांमधून अदानी बाहेर

मुंबई: अमेरिकेसह जगातील शेअर बाजारात सध्या खळबळ माजली आहे. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याचा फटका बड्या उद्योगपतींना बसला आहे. जगातील १० सर्वात श्रीमंत उद्योगपतींची संपत्ती गेल्या २४ तासांत ५५ बिलियन डॉलर्सनं कमी झाली आहे. सर्वाधिक फटका एलन मस्क आणि गौतम अदानींना बसला आहे. 

फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनियर यादीवर नजर टाकल्यास, मंगळवारी संध्याकाळी भारतीय बाजार बंद होईपर्यंत जगातील १० सर्वात श्रीमंतांच्या संपत्तीत ५५ बिलियन डॉलरची घट झाली. टेस्लाचे संस्थापक, मालक यांच्या संपत्तीत सर्वात मोठी घट नोंदवण्यात आली. गेल्या दिवसभरात त्यांना १८.७ बिलियन डॉलरचं नुकसान झालं. आता त्यांची एकूण संपत्ती २३७.१ बिलियन डॉलर इतकी आहे. सर्वाधिक नुकसान होऊनही श्रीमंतांच्या यादीतलं त्यांचं अव्वल स्थान कायम आहे.

मस्क यांच्यानंतर सर्वाधिक नुकसान भारतीय उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांचं झालं. मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या अदानी समूहाच्या सातही कंपन्यांच्या शेअर्सची घसरण झाली. अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशनचे शेअर ८-८ टक्क्यांनी घसरले. अदानी विल्मर आणि अदानी पॉवरच्या शेअर्सला लोअर सर्किट लागलं. याचा परिणाम अदानींच्या संपत्तीवर झाला. त्यांची संपत्ती ११.६ बिलियन डॉलरनं म्हणजेच ८९५ अब्ज ४६ कोटी ७२ लाख २० हजार रुपयांनी कमी झाली. त्यामुळे अदानी सर्वात श्रीमंतांच्या यादीतील पहिल्या पाचातून बाहेर गेले. आता त्यांची संपत्ती ११२.२ बिलियन डॉलर इतकी आहे. श्रीमंतांच्या यादीत ते सध्या सहाव्या स्थानी आहेत.

टॅग्स :अदानीएलन रीव्ह मस्क