Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे युद्ध नव्हे सोपे! इराणसोबत युद्धामुळे इस्रायलला मोठा फटका; ६ दिवसांत २७ हजार कोटी स्वाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 09:12 IST

बहुतांश क्षेत्रात आवश्यक सेवा वगळता इतर सर्व कामकाज ठप्प आहे. अनेक कर्मचारी घरातून काम करत आहेत. युद्धामुळे सार्वजनिक कार्यक्रम, सभांवर बंदी आली आहे.

तेल अवीव - गेल्या ६ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून सातत्याने एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. शेकडो लोक या युद्धात मारले गेलेत. त्यानंतरही हे युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. पुढील ४-५ आठवडे हे युद्ध सुरूच राहील असं बोलले जाते. अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणवर हल्ले करत आहेत. तर इराणही एकट्याने ८ देशांवर पलटवार करत आहे. मात्र या युद्धामुळे इस्रायलच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

इस्रायलच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले की, इराणसोबत सुरू असलेल्या हवाई युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला दर आठवड्याला २.९३ अब्ज डॉलरहून अधिक नुकसान होऊ शकते. भारतीय चलनात हा आकडा पाहिला तर तो २७ हजार कोटी इतका होतो. या युद्धामुळे इस्रायलला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जर पुढील काळात हे युद्ध थांबले नाही तर नुकसान आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. युद्धामुळे त्याचा फटका देशातील अन्य कामांवरही पडला आहे. इस्रायलच्या होम फ्रंट कमांडने सध्या देशात अनेक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधामुळे कामावर जाणाऱ्यांची संख्या मर्यादित झाली आहे. शाळा बंद आहेत. राखीव सैन्य दलाला मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे.

बहुतांश क्षेत्रात आवश्यक सेवा वगळता इतर सर्व कामकाज ठप्प आहे. अनेक कर्मचारी घरातून काम करत आहेत. युद्धामुळे सार्वजनिक कार्यक्रम, सभांवर बंदी आली आहे. या निर्बंधामुळे पुढील आठवड्यात अर्थव्यवस्थेला अधिक नुकसान सहन करावे लागेल. यातून सावरण्यासाठी आता अर्थ मंत्रालयाने काही प्रमाणात निर्बंधातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १-२ दिवसांत कार्यालयीन कामकाजात काही सूट दिली जाऊ शकते. जे काम युद्धामुळे आणि वर्क फ्रॉम होममुळे प्रभावित झाले आहे ते पूर्ण करता येईल. त्यातून आर्थिक नुकसान कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु निर्बंध कमी करण्याबाबत अद्याप स्पष्ट आदेश नाहीत.

दरम्यान, इस्रायलची अर्थव्यवस्था आत्ताच डबघाईला आली नाही तर हमास युद्धाच्या काळातही अर्थव्यवस्थेला फटका बसला. ज्यातून आतापर्यंत इस्रायल सावरला नाही. त्यानंतरही २०२५ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ३.१ टक्क्यांनी वाढली होती. ऑक्टोबरमध्ये युद्ध विरामानंतर २०२६ मध्ये ५ टक्क्याहून अधिक दर वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु आता इराणसोबत सुरू झालेल्या संघर्षामुळे अर्थव्यवस्था दरवाढीवर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळेच अर्थव्यवस्था संतुलित ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel's economy hit hard by Iran war, loses billions.

Web Summary : Israel's economy is suffering due to the ongoing conflict with Iran, with losses exceeding billions of dollars weekly. Restrictions and halted operations further impact the economy. The government is easing some restrictions to mitigate the financial damage, but economic recovery faces challenges.
टॅग्स :इस्रायलइराणअर्थव्यवस्थाअमेरिकायुद्ध