Raghuram Rajan on economy: रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताला 'पुढील चीन' बनण्याची महत्त्वाकांक्षा सोडून देण्याचा सल्ला दिला आहे. भारतानं उत्पादनापेक्षा सेवा आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे असं त्यांचं मत आहे. "भारतानं उत्पादन क्षेत्रात 'पुढील चीन' होण्याचं स्वप्न सोडून द्यावं. जागतिक परिस्थिती आणि काही अडचणी मोठ्या प्रमाणात, कमी किमतीच्या, फॅक्ट्री-आधारित वाढीसाठी कठीण ठरत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. राजन यांनी फ्रन्टलाईनला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलं.
"भारताला केवळ नोकरी देण्याच्या रणनीतीसाठी केवळ उत्पादन क्षेत्रावर अवलंबून राहता येणार नाही. आता दुसऱ्या चीनसाठी जागा नाही. जगात उत्पादन वाढत्या प्रमाणात स्वयंचलित होत आहे. व्हिएतनाम आणि चीनसारखे देश कमी पगारासह मजबूत पायाभूत सुविधा देखील पुरवत आहेत," असं राजन म्हणाले.
असेंब्लीसारखी कमी कौशल्याची कामं देखील यंत्रांद्वारे केली जात आहेत. कंपन्यांना आता अशा लोकांची गरज आहे जे मशीनची काळजी घेऊ शकतील. जेणेकरून आपण त्यांना दुरुस्त करू शकू. जगात उत्पादनाबाबत राष्ट्रवाद वाढत आहे. प्रत्येकाला स्वतःचा छोटासा उत्पादन उद्योग हवा असतो. म्हणून, उत्पादन क्षेत्रात आपण जास्त नोकऱ्यांची अपेक्षा करू शकत नाही, असंही राजन म्हणाले.
भारताला कुठे लक्ष देण्याची गरज?
भारताची अर्थव्यवस्था एका महत्त्वाच्या टप्प्यातून जात असताना रघुराम राजन यांचा हा इशारा आला आहे. भारतातील तरुणांच्या वाढत्या लोकसंख्येसह, नोकरीच्या संधी त्याच प्रमाणात वाढलेल्या नाहीत. राजन म्हणतात की देशाचा विकास दर ६-६.५% च्या मंद गतीनं होत आहे. सुरुवातीला ते चांगलं होतं. पण, हे आता पुरेसं नाही. याचा अर्थ असा की या वाढीसह भारताला श्रीमंत देश बनणं कठीण आहे.
भारतानं मॅन्युफॅक्चरिंगच्या मागे धावण्याऐवजी इतर अनेक पद्धतींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. भारत उच्च-मूल्याच्या सेवांमध्ये आधीच चांगली कामगिरी करत आहे. हे जागतिक सेवा निर्यातीच्या ४.५% आहे. तथापि, हे क्षेत्र सर्व नोकरी शोधणाऱ्यांना नोकऱ्या देऊ शकणार नाही. पण, भविष्यातील प्रगतीचा तो एक आवश्यक भाग असल्याचं राजन यांनी स्पष्ट केलं.
लॉजिस्टिक्स, ट्रक ड्रायव्हिंग, प्लंबिंग आणि दुरुस्ती यासारख्या कमी-कौशल्यांच्या देशांतर्गत सेवा वाढवणं देखील महत्त्वाचं आहे. जर लोकांना या नोकऱ्यांसाठी प्रशिक्षित केलं तर ते लाखो लोकांना रोजगार देऊ शकतात. तुम्हाला जिथे काम मिळेल तिथे करा. जिथे शक्य असेल तिथे नोकऱ्या निर्माण करा, असंही राजन म्हणाले.
भारतानं प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा
भारतानं आपली प्रगती वेगवान करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे. मग ते निर्यात क्षेत्र असो किंवा देशांतर्गत क्षेत्र. आपण जी-२० मध्ये सर्वात वेगाने वाढणारा देश आहोत. परंतु, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात गरीबही आहोत. हे बदलायला हवं. भारताला हे समजून घ्यावं लागेल की आता जग बदलत आहे. फक्त उत्पादनावर लक्ष केंद्रित करून काम होणार नाही. देशाची प्रगती होण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतील जेणेकरुन लोकांना नोकऱ्या मिळू शकतील. भारताला त्याची ताकद ओळखावी लागेल. त्याला स्वतःच्या अटींवर पुढे जावे लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.
आजच्या काळात भारतानं आपली धोरणं बदलणं आवश्यक आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे की 'पुढील चीन' बनणे आता शक्य नाही. म्हणून, आपल्याला आपली रणनीती बदलावी लागेल. नवीन संधींचा फायदा घ्यावा लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.