Who is Ketan Parekh : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) एक घोटाळा उघडकीस आणला असून या घोटाळ्यात केतन पारेख याच्यासह आणखी तिघांची नावं असल्याचं समोर आलंय. या लोकांनी अमेरिकेतील फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सच्या (FPI) ट्रेड्समध्ये गैरव्यवहार करून गुंतवणूकदारांची ६५.७७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सेबीनं त्यांचे पैसे जप्त करण्याचे निर्देश दिलेत. तसंच कारणे दाखवा नोटीस बजावली असून तिन्ही आरोपींवर बंदी घातली आहे.
काय आहे प्रकरण?
केतन पारेख, सिंगापूर येथील ट्रेडर रोहित साळगावकर आणि अशोककुमार पोद्दार यांनी फ्रन्ट रनिंगच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचं सेबीनं गुरुवारी, २ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय. रोहित साळगावकर आणि केतन पारेख यांनी मोठ्या गुंतवणूकदारांच्या एनपीआयमधून चुकीच्या पद्धतीने पैसे कमावण्याच्या योजना राबविल्या, असं सेबीनं म्हटलं. सेबीनं त्यांच्यासह २२ संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावून दंड आणि निर्बंध का लावू नयेत, अशी विचारणा केली आहे.
सेबीनं असंही निदर्शनास आणून दिलं की, हे लोक शेअर्स खरेदी-विक्रीसाठी आधी फ्रन्ट रनरला थेट फोन करत नव्हते. त्याऐवजी व्हॉट्सअॅप चॅट आणि व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला जात होता. हे नंबर जॅक, जॅक न्यू किंवा जॅक लेटेस्ट या नावानं सेव्ह करण्यात आले होते. जेव्हा हे नंबर तपासले गेले तेव्हा हे नंबर केतन पारेखच्या नावावर रजिस्टर असल्याचं आढून आलं आणि त्याला रोहित मदत करत होता, असंही सेबीनं म्हटलंय.
कोण आहे केतन पारेख?
केतन पारेख हे नाव २००० च्या सुमारास भारतीय शेअर बाजारात खूप प्रसिद्ध होतं. केतन ज्या शेअरवर पैसे लावायचा तो स्टॉक रॉकेट बनायचा आणि तो कंपनीचे शेअर्स विकायचा त्या कंपनीच्या शेअर्सची वाईट अवस्था व्हायची. तसा तो व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट होता आणि त्याचं कुटुंब पूर्वी बाजाराशी संबंधित होतं. कोलकाता शेअर बाजारावर त्याचा दबदबा होता. मात्र, त्याचवेळी यात अनेक घोटाळे करून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली, त्यानंतर सेबीनं त्याच्यावर १४ वर्षांची बंदी घातली. पण पुन्हा एकदा तो बाजारात सक्रीय झाल्याची माहिती समोर आली आहे.