Join us
Daily Top 2Weekly Top 5

इराणचे १६ लाखांचे ड्रोन इस्रायल-अमेरिकेच्या २५ कोटींच्या मिसाईलला वरचढ? युद्धात महासत्तांची आर्थिक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:43 IST

Economics of War : अमेरिका आणि इस्रायल इराणचे कंबरडे मोडल्याचा दावा करत आहेत. पण, वास्तव असे आहे की इराणवर युद्ध लादणारे दोन्ही देश आर्थिक अडचणींनाही तोंड देत आहेत. इराणने सोडलेल्या प्रत्येक स्वस्त ड्रोनला रोखण्यासाठी ते अंदाजे १५,००० पट जास्त खर्च करत आहेत.

Economics of War : युद्धभूमीवर आता केवळ ताकद महत्त्वाची राहिलेली नाही, तर आता 'लाभदायक' कोण, याची लढाई सुरू झाली आहे. इराण-इस्रायल संघर्ष असो किंवा रशिया-युक्रेन युद्ध, एका नवीन आर्थिक वास्तवाने जगाला हादरवले आहे. समोरच्या शत्रूच्या कोट्यवधींच्या क्षेपणास्त्राला रोखण्यासाठी स्वतःच्या तिजोरीतील अब्जावधी रुपये खर्च करणे, हे आता कोणत्याही विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी परवडणारे राहिलेले नाही. यालाच लष्करी भाषेत 'कॉस्ट अ‍ॅसिमेट्री' म्हटले जात आहे.

१५ हजार पटींचा खर्चिक फटका!युद्धभूमीवरील भीषण वास्तव समोर आले आहे. इराणचा 'शाहेद-१३६' हा ड्रोन केवळ १६ लाख रुपयांचा आहे, पण त्याला हवेत नष्ट करण्यासाठी अमेरिका किंवा इस्रायलला त्यांच्या 'पेट्रियट' मिसाईलचा वापर करावा लागतो. एका 'पेट्रियट' मिसाईलच्या फायरिंगचा खर्च सुमारे २५ कोटी रुपये आहे. याचा अर्थ, केवळ एका ड्रोनला रोखण्यासाठी रक्षक देशाला हल्लेखोरापेक्षा १५,००० पट जास्त खर्च करावा लागत आहे. ही आर्थिक तूट दीर्घकाळ सहन करणे कोणत्याही देशाच्या बजेटसाठी अशक्य आहे.

'आकाशातील एके-४७': शाहेद ड्रोनची दहशतइराणच्या शाहेद ड्रोन्सना आता 'आकाशातील एके-४७' मानले जात आहे. यांचा उद्देश केवळ हल्ला करणे हा नसून, शत्रूला आर्थिकदृष्ट्या लुटणे हा आहे. २१ कोटी रुपयांची टॉमहॉक मिसाईल मारून ३० लाखांचा ड्रोन पाडणे, हा एकप्रकारे शत्रूचाच विजय ठरतो. हल्लेखोर पक्ष जाणूनबुजून स्वस्त ड्रोनची लाट पाठवतो, जेणेकरून समोरच्या देशाचे महागडे इंटरसेप्टर्स संपून जावेत आणि त्यांची तिजोरी रिकामी व्हावी.

जमिनीवरील चित्र: टँक विरुद्ध एफपीव्ही ड्रोनजमिनीवरील युद्धातही हाच कल दिसून येत आहे. ३३ ते ४२ हजार रुपयांचा एक छोटा 'एफपीव्ही' ड्रोन, जो रिमोटने चालवला जातो, तो थेट रशियाच्या ३७ ते ६६ कोटी रुपये किमतीच्या 'टी-९०एम' किंवा अमेरिकेच्या 'अब्राम्स' टँकला काही क्षणात राख बनवत आहे. स्वस्त शिकारी ड्रोनसमोर आता महाकाय आणि महागडे रणगाडे हतबल ठरत आहेत.

वाचा - "...तो अधिकार तुम्हाला कुणी दिला?"; UAE च्या टॉप उद्योगपतीचं डोनाल्ड ट्रम्प यांना खुलं पत्र

'लेझर'चा नवा मार्गया महागड्या संरक्षण प्रणालीला पर्याय म्हणून आता जग 'लेझर तंत्रज्ञाना'कडे वळत आहे. ब्रिटनचा 'ड्रॅगनफायर' हा लेझर सिस्टम याचा उत्तम नमुना आहे. जरी हे यंत्र बनवण्यासाठी १,००० कोटी खर्च झाले असले, तरी यातून डागलेल्या एका लेझर शॉटची किंमत फक्त १,००० रुपये आहे. स्वस्त ड्रोन्सना रोखण्यासाठी आता भविष्यात अशाच लेझर तंत्रज्ञानाचा वापर होणे अपरिहार्य आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's cheap drones outsmarting costly US-Israel missiles: War's economic bind.

Web Summary : Cost asymmetry in modern warfare: Iran's inexpensive drones overwhelm expensive missile defense systems, creating an economic strain on superpowers. Lasers offer a potential cost-effective solution.
टॅग्स :इराणइस्रायलअमेरिकायुद्ध