rich dad poor dad : प्रत्येक गरीब व्यक्तीचं आयुष्यात श्रीमंत होण्याचं स्वप्न असतं. यासाठी लोक आयुष्यभर मेहनत करतात. मात्र, प्रत्येकजण यात यशस्वी होतो असं नाही. कारण, श्रीमंत होण्यासाठी फक्त पैसे कमावणे महत्त्वाचे नाही. तर त्यासाठी योग्य गुंतवणूक योजनाही माहिती असायला हव्यात. तुम्हाला प्रसिद्ध 'रिच डॅड पुअर डॅड' हे पुस्तक माहितीच असेल. या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी अमेरिका मंदीकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी लोकांना श्रीमंत होण्याचे सूत्रही सांगितले आहे.
अमेरिकेवर कर्जाचा डोंगर'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी आगामी काळ कठीण असल्याचे सांगितले. २०२५ या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्ड कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढणार असल्याचं भाकीत कियोसाकी यांनी वर्तवलं. पुढे ते म्हणाले, की अमेरिकेचे कर्ज पूर्वीपेक्षा खूप जास्त वाढले असून बेरोजगारी कमी होत नाहीये. अमेरिकन लोकांवर त्यांच्या निवृत्ती बचत खात्यांमधील पैसे खर्च करण्याची वेळ आली आहे. पेन्शनची चोरी होत आहे. अमेरिका मोठ्या मंदीकडे वाटचाल करत आहे, असे म्हणता येईल.
श्रीमंत होण्याचे सूत्रया पोस्टमध्ये, कियोसाकी यांनी लोकांना श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला देखील सांगितला आहे. या मंदीनंतर बरेच लोक 'नवीन श्रीमंत' होऊ शकतात. त्यांनी लोकांना सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यांच्या किमती भविष्यात खूप वाढतील. कियोसाकी यांच्या मते, २०३५ पर्यंत एका बिटकॉइनची किंमत १० लाख डॉलर्सपेक्षा जास्त होईल. सध्या एका बिटकॉइनची किंमत ८५,००० डॉलर आहे. सोन्याबाबत, त्यांनी भाकीत केले की त्याची किंमत प्रति औंस ३०,००० डॉलरपर्यंत पोहोचेल. सध्या ते ३३०० डॉलर प्रति औंसच्या जवळपास आहे. कियोसाकी यांनी चांदीच्या किमतीबद्दलही भाकीत वर्तवलं आहे. त्यांनी सांगितले की, पुढील १० वर्षांत चांदीची किंमत प्रति नाणे ३,००० डॉलरपर्यंत पोहोचेल, जी सध्या ३२ डॉलर आहे. येणारा १० वर्षांचा काळ खूप महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वाचा - IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
(डिस्क्लेमर : हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिला आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणताही आर्थिक धोका पत्करण्यापूर्वी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)