Join us

मस्क यांच्याकडून भारतातील Twitter च्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘गुडबाय’, पहाटे ४ वाजता मेल करत म्हटलं…

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 10:32 IST

मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी गेल्यानंतर ते एकामागून एक मोठे निर्णय घेत आहेत.

मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची मालकी इलोन मस्क यांच्याकडे गेली आहे. तेव्हापासून कंपनीत अनेक बदल झाले आहेत. एका नवीन बातमीनुसार ट्विटरने 4 नोव्हेंबर रोजी भारतातील आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि इंजिनीअरिंग विभागातील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्याचबरोबर इतर अनेक विभागांमध्येही फेरबदल करण्यात येत आहेत. कंपनीने लोकांची कशी वर्गवारी केली हे देखील जाणून घेऊया. यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना एक मेलही पाठवला आहे.

कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना पहाटे 4 वाजता एक मेल केला आहे. ‘ट्विटरला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी आम्ही ग्लोबल वर्कफोर्सला कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाणार आहोत. आम्ही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसोबतच ट्विटर सिस्टम आणि युझर डेटा साठी सर्व ऑफिसेस तात्पुरत्या स्वरुपात बंद करू. जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा जात असाल तर कृपया आपल्या घरी जा,’ असं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलंय.

यापूर्वी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि काही अन्य वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मस्क यांनी कामावरून कमी केलं होतं. त्यानंतर आता मस्क यांनी संपूर्ण कर्मचाऱ्यांनाच कमी करण्यासाठी एक मोहीम सुरू केल्याचं दिसत आहे. भारतातील कर्मचारी कपात हा याचाच एक भाग आहे. भारतात ट्विटरचे ३०० कर्मचारी आहेत आणि सर्व कार्यालयातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना मस्क यांनी कामावरून काढून टाकलंय. यानंतर आता मस्क आणखी काय बदल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच यापुढे आणखी काय होईल हे येता काळच ठरवेल.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटर