Join us
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षे राहिल्यास घर भाडेकरूचे होते? काय सांगतो कायदा? पाहा 'मालकी हक्का'बाबतचा नेमका नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:07 IST

Tenant Rights in India : तुम्ही भाडेकरू असाल किंवा घरमालक ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण, नवीन मॉडेल टेनन्सी ॲक्टने अनेक गोष्टी बदलल्या आहेत.

Tenant Rights in India : "एकाच घरात १०-१२ वर्षे भाड्याने राहिल्यास त्या घरावर भाडेकरूचा मालकी हक्क तयार होतो," अशी एक अफवा वर्षानुवर्षे पसरलेली आहे. अनेक घरमालक याच भीतीपोटी दर ११ महिन्यांनी भाडेकरू बदलतात, तर अनेक भाडेकरू याच आशेवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. मात्र, कायदेशीरदृष्ट्या या दाव्यात किती तथ्य आहे? 'मॉडेल टेनन्सी ॲक्ट' आणि जुने कायदे नेमके काय सांगतात, याचा हा विशेष आढावा.

'१० वर्षांचा नियम' ही केवळ अफवा!भारतीय कायद्यानुसार, तुम्ही एखाद्या घरात कितीही वर्षे भाड्याने राहिलात, तरी तुम्हाला त्या मालमत्तेचा मालकी हक्क मिळत नाही. रेंट कंट्रोल ॲक्ट किंवा कोणत्याही मालमत्ता कायद्यात असा कोणताही उल्लेख नाही की प्रदीर्घ वास्तव्यामुळे मालकी हस्तांतरित होते. त्यामुळे भाडेकरूंनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घरमालकांनी घाबरून जाऊ नये.

जुना रेंट कंट्रोल ॲक्ट विरुद्ध नवीन कायदा

  • जुना कायदा (१९४०-५० चा काळ) : महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांत हा कायदा अजूनही काही प्रमाणात प्रभाव पाडतो. यात भाडेकरूला सहजासहजी घराबाहेर काढणे कठीण होते आणि भाडे वाढवण्यावरही मर्यादा होत्या. पण, यातही मालकी हक्क भाडेकरूला देण्याची तरतूद कधीच नव्हती.
  • नवीन कायदा : आता १० हून अधिक राज्यांत लागू झालेल्या या कायद्याने चित्र स्पष्ट केले आहे. यात घरमालक आणि भाडेकरू दोघांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात आले असून मालकी हक्काबाबतचा संभ्रम दूर केला आहे.

भाडेकरूंचे आणि घरमालकांचे महत्त्वाचे हक्क

  1. कोणत्याही भाडेकरूला घर रिकामे करण्यासाठी घरमालकाने किमान २ महिने आधी लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे.
  2. वार्षिक भाडेवाढ साधारणपणे १० टक्क्यांहून अधिक असू नये, असे नवीन नियम सुचवतात.
  3. निवासी घरासाठी जास्तीत जास्त २ महिन्यांचे भाडे अनामत रक्कम म्हणून घेता येते. जर तुम्ही पीजीमध्ये राहत असाल, तर केवळ १ महिन्याचे डिपॉझिट पुरेसे आहे.
  4. प्रत्येक भाडेकरूने दरमहा भाड्याची पावती घेणे आणि त्याचा डिजिटल रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे.

सुरक्षेसाठी 'या' गोष्टी आवर्जून करा

  • लेखी करार : तोंडी व्यवहारापेक्षा नेहमी लिखित करार करावा.
  • नोंदणी : रेंट ॲग्रीमेंट नेहमी स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणीकृत असावे, जेणेकरून वादाच्या प्रसंगी ते न्यायालयात पुरावा म्हणून वापरता येईल.
  • कोर्टात दाद : जर घरमालक विनाकारण त्रास देत असेल किंवा करार पाळत नसेल, तर भाडेकरू 'टेनन्सी कोर्ट'मध्ये दाद मागू शकतो.

वाचा - सॉरी विसरलो... चालणार नाही! 'या' तारखेपासून HSRP नंबरप्लेट नसेल तर बसणार दंडथोडक्यात सांगायचे तर, तुम्ही एखाद्या घरात १० वर्षे राहा किंवा ५० वर्षे, जोपर्यंत तुम्ही तिथे भाडेकरू म्हणून राहत आहात आणि भाडे भरत आहात, तोपर्यंत तुम्ही त्या घराचे मालक बनू शकत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : 10 years stay makes tenant owner? Property law explained.

Web Summary : Staying 10 years doesn't grant ownership. Old rent control acts differ from new laws protecting owners' rights. Written agreements, registration, and tenant courts offer security.
टॅग्स :सुंदर गृहनियोजनबांधकाम उद्योगन्यायालय