Join us

TCS कंपनीला अवघ्या ९९ पैशांत २१.१६ एकर जमीन! 'या' राज्याच्या सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 10:19 IST

Andhra Pradesh : टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी टीएसीएसला आंध्र प्रदेश सरकारने अवघ्या ९९ पैशात २१.१६ एकर जमीन दिली आहे. यातून १२,००० नोकऱ्या निर्माण होतील असा दावा केला जात आहे.

Andhra Pradesh : देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) आंध्र प्रदेश सरकारने रेड कार्पेट अंथरलं आहे. मंगळवारी झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत विशाखापट्टणममधील २१.१६ एकर जमीन टीसीएसला भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जमिनीची भाडेपट्टा किंमत फक्त ९९ पैसे प्रतिवर्ष ठेवण्यात आली आहे. आयटी हिल नंबर तीन वर स्थित असलेली ही जमीन आता आयटी कॅम्पस म्हणून वापरली जाईल. प्रस्तावित कॅम्पसमध्ये टीसीएस १,३७० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे १२,००० नोकऱ्या निर्माण होण्याचा दावा केला जात आहे.

स्टील प्लांटच्या विस्तारालाही हिरवा झेंडा सरकारने निवेदनात म्हटलं आहे, की मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आयटी हिल क्रमांक ३ येथे टीसीएसला आयटी कॅम्पस उभारण्यासाठी २१.१६ एकर जमीन देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे १२,००० लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, राज्य मंत्रिमंडळाने विजयनगरम येथे एकात्मिक स्टील प्लांटच्या विस्तारासाठी महामाया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रस्तावालाही मान्यता दिली.

टीसीएसच्या तिमाही निकाल कसे आहेत?टीसीएसने गेल्या आठवड्यात १० एप्रिल रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी-मार्च तिमाहीत टीसीएसचा निव्वळ नफा १.६ टक्क्यांनी घसरून १२,२२४ कोटी रुपयांवर आला. दरम्यान, या काळात कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर वाढ झाली. चौथ्या तिमाहीत टीसीएसला विक्रमी १२.२ अब्ज डॉलर्सचे करार मिळाले. याशिवाय, कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ३० अब्ज डॉलर्सचा महसूल टप्पाही ओलांडला.

वाचा - 'या' बिझनेस वुमनने रात्रीत 'अंबानीं'ना टाकलं मागे; देशातील सर्वात श्रीमंत महिला; किती आहे संपत्ती?

मंगळवारी कंपनीचे शेअर्स वाढीसह बंदमंगळवारी, बीएसई वर टीसीएसचे शेअर्स ०.४८ टक्क्यांनी (१५.४० रुपये) वाढून ३२४७.७० रुपयांवर बंद झाले. कंपनीचे शेअर्स अजूनही त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा खूपच खाली आहेत. टीसीएसच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४५८५.९० रुपये आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप ११,७५,०४६.२८ कोटी रुपये आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत ती रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेनंतर भारतातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

टॅग्स :टाटामाहिती तंत्रज्ञानआंध्र प्रदेशचंद्राबाबू नायडू