TCS Employees Salary Hike : देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने बहुतांश कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४.५% ते ७% पर्यंत वाढ जाहीर केली आहे. सोमवारी रात्री उशिरा कंपनीने कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची पत्रे पाठवण्यास सुरुवात केली असून, ही वाढ सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी टीसीएसने सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते, अशा वेळी ही वेतनवाढ जाहीर होणे ही मोठी गोष्ट आहे. त्यावेळी या निर्णयाची आयटी क्षेत्रात आणि शेअर बाजारातही मोठी चर्चा झाली होती, ज्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरणही झाली होती.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना १०% पेक्षा जास्त वाढअहवालानुसार, या वेतनवाढीचा सर्वाधिक फायदा खालच्या आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना झाला आहे. त्याचबरोबर, ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यांना १०% पेक्षा जास्त वाढ देण्यात आली आहे. यापूर्वी, एप्रिल-जून तिमाहीच्या निकालांमध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण थोडे वाढलेले पाहिले होते, जे १३.८% पर्यंत पोहोचले होते. आता कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांना कंपनीसोबत टिकवून ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.
वाढीमुळे खर्चात वाढ, पण विश्वास वाढणारकर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे टीसीएसचा खर्च वाढणार असल्याने गुंतवणूकदार सुरुवातीला थोडे सावध होऊ शकतात आणि शेअरवर थोडा दबाव येऊ शकतो. पण, कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवल्याने कंपनीच्या वाढीला आणि क्लायंट्स टिकवून ठेवण्यास मदत होईल, ज्यामुळे दीर्घकाळात गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढू शकतो.
वाचा - चांदीने दिला तब्बल ४०% परतावा! पहिल्यांदाच १.२५ लाखांचा टप्पा पार, ‘या’ कंपन्यांना मोठा फायदा
यापूर्वी, बाजाराची स्थिती आणि खर्चाचा दबाव यामुळे टीसीएसने वेतनवाढीचा निर्णय दोन महिने थांबवला होता. जुलैमध्ये कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष मिलिंद लक्कड यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, आता सप्टेंबरपासून वेतनवाढ लागू करून कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, ती आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्यास कटिबद्ध आहे.