Join us

'हा' फोन कॉल तुम्हालाही येऊ शकतो! राज्यसभा खासदार सुधा मूर्तींसोबत काय घडले, नक्की जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:51 IST

MP Sudha Murty : राज्यसभा खासदार सुधा मूर्ती सायबर फसवणुकीचा बळी ठरल्या. त्यांच्या मोबाईल नंबरवरून ऑनलाइन अश्लील व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याचं सांगून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला.

MP Sudha Murty : गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी प्रतिष्ठीत लोकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यात प्रसिद्ध समाजसेविका आणि राज्यसभा खासदार सुधा मूर्ती बळी पडल्या आहेत. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला दूरसंचार विभागाचा अधिकारी सांगून त्यांना धमकी दिली. तुमच्या मोबाईल नंबरवरून अश्लील व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित होत असल्याची खोटी भीती घालून त्यांची मोबाईल सेवा बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

नक्की काय घडले?ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. सुधा मूर्ती यांना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण दूरसंचार विभागाचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यामुळे सुधा मूर्तींचा गुन्हेगारावर विश्वास बसला. तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला नाही आणि त्यामुळे त्याचा गैरवापर होत असल्याचं त्याने सांगितलं. यावर सुधा मूर्ती यांनी लगेच पोलिसांत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, हा नंबर ट्रू-कॉलर ॲपवरही 'दूरसंचार विभाग' असाच दिसत होता, ज्यामुळे या फसवणुकीला अधिक बळ मिळाले.

सुधा मूर्ती यांनी लगेच दाखल केली एफआयआरया फसवणुकीची कल्पना आल्यानंतर सुधा मूर्ती यांनी कोणताही वेळ न घालवता तातडीने बेंगळुरू येथील सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, फोन करणाऱ्या व्यक्तीने दूरसंचार विभागाचा अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून मूर्ती यांच्याकडून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी महत्त्वाचे उपायआजकाल सामान्य लोकांनाही अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीचा सामना करावा लागतो. त्यामुळे, सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.

  • अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका: फसवणूक करणारे स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे भासवतात, पण त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवू नका.
  • वैयक्तिक माहिती शेअर करू नका: तुमचा मोबाईल नंबर, आधार किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही फोनवर शेअर करू नका.
  • संशयाच्या वेळी लगेच पोलिसांना कळवा: कोणताही फोन संशयास्पद वाटल्यास, संबंधित विभागाला किंवा पोलिसांना तातडीने माहिती द्या.

वाचा - निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

एक प्रतिष्ठित व्यक्ती अशा सायबर फसवणुकीचा शिकार झाल्याने, सर्वांनीच यापासून सतर्क राहणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sudha Murty falls prey to cyber fraud: Stay vigilant!

Web Summary : Rajya Sabha MP Sudha Murty was targeted by cybercriminals posing as telecom officials. They falsely claimed her number was linked to illicit content and threatened service termination. Murty promptly filed a police complaint, highlighting the need for public vigilance against such scams.
टॅग्स :सुधा मूर्तीसायबर क्राइमगुन्हेगारीऑनलाइन