Join us

Stock Market Today: ३१२ अंकांच्या तेजीसह उघडला शेअर बाजार, रियल्टी क्षेत्रात जोरदार खरेदी; का रॉकेट झालंय मार्केट? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:57 IST

Stock Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स ३१२ अंकांनी वधारून ७८,२९६ वर पोहोचला.

Stock Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स ३१२ अंकांनी वधारून ७८,२९६ वर पोहोचला. निफ्टी ९३ अंकांच्या वाढीसह २३,७५१ वर उघडला. बँक निफ्टीमध्येही आज खरेदी दिसून आली. तो १७० अंकांनी वधारून ५१,८७४ वर उघडला. आज सुरुवातीच्या व्यवहारात सर्वाधिक खरेदी रियल्टी सेक्टर इंडेक्समध्ये दिसून आली आहे. तो १.७ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. कालप्रमाणेच आजही बाजारात जवळपास सर्वच क्षेत्रांच्या निर्देशांकात तेजी दिसून आली. निफ्टी फार्मापासून ऑटो, मेटल आणि एफएमसीजीपर्यंत सर्वच शेअर्समध्ये जोरदार ट्रेडिंग सुरू आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून लागू होणाऱ्या शुल्काबाबत नरम भूमिका घेण्याचं संकेत दिले असून काही देशांना सूट दिली जाऊ शकते. ऑटो, अॅल्युमिनियम आणि फार्मा क्षेत्रावर सध्या तरी शुल्क लादण्याचा कोणताही इरादा नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत आजपासून तीन दिवसांची महत्त्वाची बैठक सुरू होत असून, त्यात दोन्ही देशांचे अधिकारी द्विपक्षीय व्यापार कराराच्या अटींना अंतिम रूप देणार आहेत. त्याचा परिणाम आज बाजारावरही दिसून येत आहे. कालही बाजारात जोरदार तेजी आली होती.

ट्रम्प यांची नरम भूमिका आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे अमेरिकेच्या बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जबरदस्त तेजी दिसून आली. डाऊ जोन्स ६०० अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर नॅसडॅक ४०० अंकांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. आशियाई बाजारातही तेजी पाहायला मिळत असून, जपानचा निक्केई निर्देशांक ४०० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. त्याचबरोबर भारतीय बाजाराचे संकेतही मजबूत आहेत, गिफ्ट निफ्टी ५० अंकांनी वधारून २३,७५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

व्हेनेझुएलाच्या बहाण्यानं चीनवर दबाव

ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर २ एप्रिलपासून २५ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली आहे, जो चीनवरील अप्रत्यक्ष हल्ला मानला जात आहे. या निर्णयानंतर सलग चौथ्या दिवशी कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आणि ब्रेंट क्रूड ७२ डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचलं. मात्र, डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ३०५० डॉलर प्रति औंसच्या खाली आहे, तर चांदी ३३ डॉलर प्रति औंसच्या आसपास स्थिर आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ५०० रुपयांनी घसरून ८७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीचा भाव ३०० रुपयांनी घसरून ९७,६०० रुपये प्रति किलो झाला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजारबांधकाम उद्योग