Stock Market Today: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शुल्काबाबत यू-टर्न घेतल्याच्या बातमीनंतर आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. भारतीय बाजारानं शानदार सुरुवात केली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीनं ग्रीन झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. सेन्सेक्स १६८ अंकांनी वधारून ७४,२७० अंकांवर उघडला. निफ्टी ५० देखील ३९ अंकांच्या वाढीसह २२,५३६ वर उघडला.
बँक निफ्टीचीही हीच स्थिती होती, जो ४१ अंकांनी वधारून ४७,८९४ वर उघडला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर आयटी, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक वगळता निफ्टीच्या सर्व सेक्टोरल निर्देशांकांमध्ये आज तेजी दिसून आली. पीएसयू बँक आणि ऑटो निर्देशांकात तेजी होती.
या शेअर्समध्ये तेजी / घसरण
कामकाजादरम्यान, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, कोटक बँक, पॉवरग्रीड आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. तर दुसरीकडे नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस आणि इन्फोसिस यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
हाय व्होल्टेज ड्रामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ वॉरवर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आधी कॅनडातून आयात होणाऱ्या पोलाद आणि अॅल्युमिनियमवरील शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण अवघ्या ६ तासांत तो मागे घेण्यात आला. याशिवाय कॅनडातून आयात होणाऱ्या विजेवर २५ टक्के अधिभाराचा निर्णयही मागे घेण्यात आल्याने टॅरिफ वॉरबाबत अमेरिकेची नरम भूमिका स्पष्टपणे दिसून आली.
डॉलर कमकुवत
टॅरिफ वॉरच्या धक्क्यानं अमेरिकन शेअर बाजारावर दबाव आला. डाऊ जोन्स जवळपास ५०० अंकांनी तर नॅसडॅक ३० अंकांनी घसरून बंद झाला. मात्र, ट्रम्प यांच्या यू-टर्ननंतर डाऊ फ्युचर्समध्ये ७५ अंकांची तेजी दिसून आली. गिफ्ट निफ्टी २२,५५० च्या जवळ फ्लॅट बंद झाला, तर जपानचा बाजार निक्केई ७० अंकांच्या तेजीसह बंद झाला. डॉलर निर्देशांकही चार महिन्यांच्या नीचांकी १०३.५० च्या खाली घसरला.