झीरोदा या ब्रोकरेज फर्मचे सहसंस्थापक असलेल्या निखिल काम यांनी आर्थिक क्षेत्रात अल्पावधीमध्ये मोठं यश मिळवलं आहे. दरम्यान, निखिल कामत यांची बिझनेसबाबत जेवढी स्पष्ट मतं आहेत. तेवढीच त्यांची पर्सनल लाईफ आणि रिलेशनशिपबाबतही रोखठोक भूमिका असल्याचं एका मुलाखतीमधून दिसून आलं आहे. या मुलाखतीमध्ये निखिल कामत यांनी त्यांच्या फ्युचर प्लॅनबाबत जे काही सांगितलं ते ऐकून सारेच अवाक झाले आहेत.
एका पॉडकास्टमध्ये निखिल कामत यांनी विवाह आणि मुलांबाबत आपली मतं स्पष्टपणे मांडली. त्यांनी सांगितले की, आपला वारसा पुढे चालवण्यासाठी मुलं जन्माला घालण्याचा मला शौक नाही आहे. वृद्धापकाळात आधार होतील म्हणून मुलांना जन्म देऊन त्यांचं १८-२० वर्षे पालन पोषण करण्याची माझी इच्छा नाही. मी १८-२० वर्षे मुलांचं संगोपन करायचं. मग ती माझी देखभाल करतील, असा विचार करायचा आणि १८ वर्षांनंतर मुलांनी माझी देखभाल करण्यास नकार दिला तर काय? असा प्रश्न निखिल कामत यांनी उपस्थित केला.
तुम्ही इतर प्राण्यांप्रमाणे जन्म घेता आणि त्यांच्याप्रमाणेच मरता. तुमचा मृत्यू झाल्यानंतर कुणी तुमची आठवण काढत नाही. मृत्युनंतर कुणीतरी आठवण काढावी म्हणून मुलांना जन्म देणं व्यर्थ आहे, असं परखड मत निखिल कामत यांनी मांडलं.
ते पुढे म्हणाले की, भारतामध्ये सरासरी वय हे ७२ वर्षे एवढं आहे. त्या हिशोबाने माझ्याकडे अजून ३५ वर्षे आहेत. आता पुढच्या २० वर्षांत मी जी काही कमाई करेन आणि मागच्या २० वर्षांत मी जे काही कमावलं आहे ते पैसे बँकेत सोडून जाण्यात काही अर्थ नाही. अशी रक्कम बँकेत कुणासाठी तरी सोडून जाण्याऐवजी मी ती रक्कम कुठल्या तरी संस्थेला दान देणं पसंत करेन, असेही त्यांनी सांगितले. निखिल कामत यांच्याकडे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे. तसेच त्यांच्या झीरोदा या कंपनीचं बाजारमूल्य ६४ हजार ८०० कोटी रुपये एवढं आहे.