Share Market Today: अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लागू करण्याच्या निर्णयाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या सत्रातच बीएसई सेन्सेक्स ४८१ अंकांनी घसरून ८०,३०५ च्या पातळीवर उघडला. त्याचप्रमाणे, निफ्टी १२७ अंकांनी घसरून २४,५८५ च्या पातळीवर आला आणि २४,६०० च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली गेला. सत्रादरम्यान बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. या मोठ्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांना ४.१४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
घसरणीचे प्रमुख कारणअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या काही वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर होण्याची भीती आहे. विशेषतः टेक्सटाईल, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायन यांसारख्या क्षेत्रांवर याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली.
बाजार दोन दिवसांपासून दबावातही घसरण केवळ आजच्या सत्रापुरती मर्यादित नाही. मंगळवारीही याच कारणामुळे बाजारात मोठी घसरण झाली होती. अमेरिकेचे टॅरिफ लागू होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला असून, मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली आहे.
घसरणीची इतर कारणे
- परदेशी गुंतवणूकदारांची (FIIs) विक्री: गेल्या काही दिवसांपासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) सातत्याने भारतीय शेअर बाजारातून पैसे काढत आहेत, ज्यामुळे बाजारावर विक्रीचा दबाव वाढला आहे.
- जागतिक नकारात्मक संकेत: अमेरिकेच्या बाजारातील कमजोरी आणि आशियातील इतर बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजाराला नकारात्मक जागतिक संकेत मिळाले.
- रुपया कमजोर: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर झाल्यानेही शेअर बाजारावर अतिरिक्त दबाव दिसून येत आहे.
वाचा - अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर! भारत 'या' ४० देशांसोबत करणार व्यापार, कोणत्या वस्तू विकणार? पाहा...
या सर्व कारणांमुळे आज बाजारातील वातावरण तणावपूर्ण राहिले. विश्लेषकांच्या मते, जोपर्यंत टॅरिफच्या मुद्यावर अधिक स्पष्टता येत नाही, तोपर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहू शकते. गुंतवणूकदारांनी सध्या सावधगिरी बाळगावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.