Join us  

PM मोदी बोलले अन् गुंतवणूकदार तुटून पडले, 'या' सरकारी कंपनीने केले मालामाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 2:49 PM

लोकसभा निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पण, सरकारी कंपन्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा देत आहेत.

Share Market: लोकसभा निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी बाजार अचानक वर चढतो, तर कधी एकदम खाली आपटतो. पण, अशा परिस्थितीतदेखील एका सरकारी कंपनीच्या शेअरन गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या शेअरचा संसदेत उल्लेख केला होता. गुंतवणूकदारांना मालामाल करणारा हा शेअर संरक्षण क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा आहे. 

ज्यादिवशी पंतप्रधान मोदींनी संसदेत या कंपनीचा उल्लेख केला, तेव्हापासून या शेअरने गुंतवणूकदारांना दमदार परतावा देण्यास सुरुवात केली. आता यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या ऑगस्टपासून या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 140 टक्के परतावा दिला आहे. 10 ऑगस्ट 2023 रोजी HAL चे शेअर्स 1895 रुपये होते, जे आता 4539 रुपयांवर आले आहेत. देशात स्थिर सरकार स्थापन झाल्यास या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.

काय म्हणाले होते पीएम मोदी?10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सुमारे 2 तास 13 मिनिटे भाषण केले. या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना पीएम मोदी म्हणाले की, विरोधक एलआयसी, एचएएल सारख्या कंपन्यांचे नाव घेऊन सरकारवर टीका करतात. पण, आज या सर्व कंपन्या प्रॉफिटमध्ये आहेत आणि गुंतवणूकदारांनाही मोठ्या प्रमाणात परतावा देत आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी या कंपन्यांवर लक्ष ठेवावे, असे मोदी म्हणाले होते.

दमदार नफा दिलाहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने गुरुवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने 4,308 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. जो मागील वर्षाच्या तुलनेत 52 टक्के अधिक आहे. या उत्कृष्ट निकालाचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला. गुरुवारी काही वेळातच HAL च्या शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. 

जाणकार काय म्हणतात?एचएएलच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बाजार तज्ज्ञ सुमीत बगाडिया यांच्या मते सरकारी कंपनीचा शेअर 4800 चा टप्पा ओलांडू शकतो. सुमारे 3 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली कंपनी चांगल्या स्थितीत आहे. कंपनी जवळजवळ कर्जमुक्त झाली आहे. दरम्यान, HAL ने गुंतवणूकदारांना 25.8 टक्के लाभांशही दिला आहे.

या सरकारी कंपन्यांनी दिला दमदार परतावाHAL व्यतिरिक्त इतर काही सरकारी कंपन्यांचे शेअर्सदेखील गुंतवणूकदारांसाठी लकी ठरले आहेत. यामध्ये IC, रेल विकास निगम, MMTC, NDMC, सेंट्रल बँक, UCO बँक, IRCON, NHPC सह 56 कंपन्यांचा यात समावेश आहे. रेल्वे विकास निगमने एका वर्षात गुंतवणूकदारांना 138 टक्के परतावा दिला आहे, तर NMDC ने 158 टक्के नफा कमावला आहे. IRCON बद्दल बोलायचे तर, या कंपनीने गुंतवणूकदारांना 227 टक्के इतका मोठा नफा दिला.

(टीप-शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

 

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूकनरेंद्र मोदीलोकसभा निवडणूक २०२४