Join us

Share Market Close: अदानीचा शेअर 8.42 टक्क्यांनी कोसळला; शेअर बाजारात मोठी पडझड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 17:45 IST

सगळीकडे विक्रीचा ट्रेंड दिसल्याने आज फार्मा वगळता सर्व सेन्सेक्स खालच्या पातळीवर बंद झाले.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने मान टाकली आहे. सकाळी बाजार खुला झाल्यापासून जो लाल रंग दिसत होता तो बाजार बंद होईस्तोवर कायम होता. बीएसई सेंसेक्स 638 अंकांच्या घसरणीनंतर 56,788 वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 207 अंकांच्या घसरणीनंतर 16,887 वर बंद झाला. याचा परिणाम मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअरवरदेखील झालाय निफ्टी मिडकॅप 1.25 टक्के आणि स्मॉल-कॅप 0.66 टक्क्यांनी कोसळला. 

कंपन्यांच्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेसचे शेअर सर्वाधिक घसरले. हा शेअर 8.42 टक्क्यांनी कोसळून 3,164.75 रुपयांवर बंद झाला. आयशर मोटर्स, अदानी मोटर्स, टाटा कंज्यूमर प्रोडक्ट्स आणि मारुतीच्या शेअरमध्येही घसरण झाली. याविरुद्ध ओएनजीसी, डॉ रेड्डीज, सिप्ला, बीपीसीएल आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ झाली. 

शेअर बाजाराला आज गेल्या आठवड्यातील शेवटच्या शुक्रवारची गती कायम ठेवता आली नाही. सेन्सेक्स 151 अंकांनी घसरून 57,277 वर उघडला. तर निफ्टी 46 अंकांनी घसरून 17,049 वर उघडला. आशियाई शेअर बाजारात संमिश्र कल दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सलग सात दिवस शेअरबाजार कोसळला होता, परंतू गेल्या शुक्रवारी त्यात दिलासा मिळाला होता. वाढती महागाई कमी करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवू शकतात, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरातील मंदीची भीती आणखी वाढणार आहे.

सगळीकडे विक्रीचा ट्रेंड दिसल्याने आज फार्मा वगळता सर्व सेन्सेक्स खालच्या पातळीवर बंद झाले. मेटल आणि पीएसयू बँकिंगला सर्वाधिक फटका बसला. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. 

टॅग्स :शेअर बाजारअदानी