Join us

Budget 2022: आधी उसळी, मग घसरगुंडी; अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात जैसे थे परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 13:44 IST

Budget 2022: सुरुवातीला बाजारात दिसत असलेली तेजी अर्थसंकल्पानंतर गायब

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफि इंडिया डिजिटल चलन आणणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करताच शेअर बाजारानं उसळी घेतली. मात्र त्यानंतर लगेचच सेन्सेक्स आणि निफ्टी खाली आले. डिजिटल चलनाची घोषणा झाल्यानंतर सेन्सेक्स ५९ हजारांपर्यंत पोहोचला. मात्र अर्थसंकल्पाचं वाचन पूर्ण होईपर्यंत सेन्सेक्स ५८ हजार २२१ पर्यंत खाली आला. निफ्टीची स्थितीही काहीशी अशीच होती.

अर्थमंत्री प्रत्यक्ष कराबद्दलच्या घोषणा करत असताना शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सनं ९०० अंकांची उसळण घेतली. सेन्सेक्स ५९ हजारांच्या पुढे गेला. निफ्टीमध्ये २०० अंकांची वाढ पाहायला मिळाली. अर्थमंत्री सीतारामन यांनी गती शक्तीची योजना केल्यावर इन्फ्रा कंपन्यांचे शेअर वधारले. पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग जवळपास ७ टक्क्यांनी वधारले.

टेलिकॉम क्षेत्रासाठीच्या घोषणा होत असताना आयडियाचा शेअर ४ टक्क्यांनी वधारला. मल्टी मॉडल लॉजिस्टिकच्या विकासावर भर देण्यासंदर्भात अर्थमंत्री बोलत असताना महिंद्रा लॉजिस्टिक्स, कंटेनर कॉर्पोरेशन आणि एजिस लॉजिस्टिकच्या समभागांची किमती २.३ टक्क्यांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. इन्फ्राचा उल्लेख सुरू असताना अंबुजा सिमेंट, श्री सिमेंट, अल्ट्रा सिमेंट कंपन्यांच्या समभागांचं मूल्य १ ते १.५ टक्क्यांनी वाढलं. अशोका बिल्डकॉन, जीएमआर इन्फ्रा, एल एँड टीसारख्या कंपन्यांचे समभाग ३ टक्क्यांनी वधारले.

टॅग्स :अर्थसंकल्प 2022शेअर बाजारनिर्मला सीतारामन