Join us

पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:04 IST

बाजार नियामक सेबीने आपल्या प्रमुखासाठी मुंबईतील प्रभादेवीमध्ये एक आलिशान पाच खोल्यांचे सी फेसिंग अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे.

SEBI : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजेच SEBI ने आपले नवीन अध्यक्ष तुहीन कांत पांडे (Tuhin Kanta Pandey) यांच्यासाठी मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. या घराचे मासिक भाडे तब्बल ७ लाख रुपये आहे.

३,००० चौ.फुटात पसरलेले हे ५ बेडरूमचे अपार्टमेंट दक्षिण मुंबईतील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील रुसतमजी क्राउन या गगनचुंबी इमारतीच्या ५१व्या मजल्यावर आहे. या घरासोबत चार गाड्यांच्या पार्किंगची सुविधाही देण्यात आली आहे. करारानुसार सेबीने ४२ लाख रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिटही भरले असून, दरवर्षी भाड्यात ५ टक्के वाढ होणार आहे. ही माहिती एका प्रॉपर्टी डेटा अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्मकडून मिळाली आहे.

तुहीन कांत पांडे यांनी १ मार्च रोजी सेबी प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. त्यापूर्वी ते विनिवेश विभागाचे (दीपम) सचिव होते. त्यांनी सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची जागा घेतली, ज्यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपला होता.

सेबीची धोरणे काय सांगते?

सेबीच्या माहितीनुसार, अध्यक्ष, होल टाइम मेंबर्स, कार्यकारी संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी भाड्याने घर उपलब्ध करुन देण्याचे धोरण आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या पदानुसार घराचे आकारमान आणि भाड्याची रक्कम निश्चित केली जाते. पांडे यांच्यासाठी घेतलेले हे घर बोर्डाच्या मान्य धोरणानुसार असून, अपार्टमेंटचा आकार आणि भाडे निश्चित मर्यादेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय, भाड्याची रक्कम ही एका प्रमुख मालमत्ता मूल्यांकन अहवालावर आधारित आहे.

सेबी प्रमुखांचे वेतन किती?

माधबी बुच यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी वित्त मंत्रालयाने सेबी प्रमुख पदासाठी अर्ज मागवले होते. त्यावेळी वेतनासाठी दोन पर्याय देण्यात आले होते. 

पहिला पर्याय- सेबी प्रमुखांना भारत सरकारच्या सचिवांच्या तोडीस तोड वेतन मिळेल.

सचिवांचा बेसिक पगार ₹२,२५,०००

त्यावर ५५% महागाई भत्ता आणि इतर भत्ते

दुसरा पर्याय-  दरमहा ₹५,६२,५०० ची कन्सॉलिडेटेड सॅलरी.

मात्र या पर्यायात कार आणि घराची सुविधा नव्हती.

टॅग्स :सेबीमुंबईशेअर बाजार