Join us

SEBI नं १५ हजार वेबसाइट्स आणि इन्फ्लुएनर्सवर घातली बंदी! करत होते दिशाभूल, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:16 IST

Sebi Bans Finfluencers : तुम्हीही युट्युब आणि इन्स्टाग्रामवर शेअर मार्केट इन्फ्लुएंसरकडे पाहून शेअरची खरेदी-विक्री करत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

तुम्हीही युट्युब आणि इन्स्टाग्रामवर शेअर मार्केट इन्फ्लुएंसरकडे पाहून शेअरची खरेदी-विक्री करत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. खरं तर २०२४ मध्ये शेअर बाजाराबाबत लोकांची दिशाभूल करणाऱ्या अनेकांवर कारवाई करण्यात आली. यातील एका प्रभावशाली व्यक्तीवर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) यावर्षी १५ हजारांहून अधिक कंटेन्ट साइट्सवर बंदी घातली आहे.

सेबीची कारवाई

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्यांवर सेबीनं यंदा मोठी कारवाई केली आहे. सेबीनं १५,००० हून अधिक कंटेन्ट साइट्स आणि अनेक फायनान्शिअल इन्फ्लुएंसरवर बंदी घातली आहे. या सर्वांवर सोशल मीडियावर गुंतवणुकीचा खोटा सल्ला देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आणि कष्टानं कमावलेल्या पैशाचं नुकसान केल्याचा आरोप आहे.

काय कारवाई केली?

सेबीनं या वर्षी केलेल्या कारवाईत रवींद्र बाळू भारती आणि नसीरुद्दीन अन्सारी यांसारख्या अनेक व्यक्तींच्या वित्तीय संस्थांवर बंदी घातली. अन्सारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर 'बाप ऑफ चार्ट' या नावानं अॅक्टिव्ह होता, जिथे तो शेअर्स खरेदी-विक्रीची शिफारस करायचा. सेबीनं अन्सारी आणि त्याच्या सहकाऱ्यांना एस्क्रो खातं उघडून १७ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या रकमेचा वापर त्यांच्या सेवेचा वापर करणाऱ्या गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी केला जाईल.

याशिवाय अन्सारीला २० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पदमती, तबरेज अब्दुल्ला, वानी आणि वामशी यांच्यासह त्याच्या साथीदारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शुभांगी रवींद्र भारती, राहुल अनंत गोसावी, धनश्री चंद्रकांत गिरी यांनाही शेअर बाजारातून बंदी घालण्यात आली आहे.

खेळ कसा होता?

सेबीच्या चौकशीत असं दिसून आलंय की या इन्फ्लुएन्सर्सनं कोणत्याही डिस्क्लेमरशिवाय विशिष्ट शेअर्सची जाहिरात केली. यामुळे गुंतवणूकदारांची दिशाभूल तर झालीच, शिवाय बाजारात शेअर्सच्या किमतीही वाढल्या, जे बाजाराच्या नियमांच्या विरोधात आहे.

फिनन्फ्लुएंसरची वाढती क्रेझ

फिनन्फ्लुएंसर म्हणून ओळखले जाणारे फायनान्शियल इन्फ्लुएंसर आजकाल सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय होत आहेत. शेअर बाजारात झटपट पैसे कमावण्याची रणनीती सांगण्याचा दावा हे लोक करतात. त्यातील काही जण योग्य माहिती देतात, तर अनेक प्रभावशाली लोक आपल्या फॉलोअर्सच्या विश्वासाचा गैरवापर करतात. त्यामुळेच सेबीने गुंतवणूकदारांना केवळ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागारांचंच मत घेण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर दिलेल्या सल्ल्याचा विचार न करता गुंतवणूक करणं धोक्याचं ठरू शकतं.

टॅग्स :शेअर बाजारसेबीगुंतवणूक