Join us

पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 07:49 IST

PF Money Withdrawal Rules: ही मर्यादा पूर्वी १ लाख रुपये होती. ईपीएफओने वैद्यकीय, शिक्षण, लग्न किंवा घरांसाठी ऑटो सेटलमेंट सुविधा सुरू केली आहे.

नवी दिल्ली: अतिशय संकटाच्या काळात आता केवळ ७२ तासांत पीएफ खात्यातून ५ लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत. ही मर्यादा पूर्वी १ लाख रुपये होती. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे. 

यापूर्वी, कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी २८ मार्च रोजी श्रीनगर येथे झालेल्या ईपीएफओच्या कार्यकारी समितीच्या (ईसी) ११३ व्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला होता.

प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केवायसी अपडेट हवे...

ऑटो सेटलमेंटमध्ये, पीएफ काढण्याच्या दाव्याची प्रक्रिया सिस्टमद्वारे स्वयंचलितपणे केली जाते. यामध्ये मानवी हस्तक्षेप कमी असतो.

जर तुमचा यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आधार, पॅन आणि बँक खात्याशी जोडलेला असेल आणि केवायसी पूर्णपणे अपडेट केलेला असेल, तर सिस्टीम तुमचा क्लेम तपासेल.

ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि आयटी सिस्टमवर आधारित असल्याने अतिशय जलद असून ३ ते ४ दिवसांत ही प्रोसेस पूर्ण होते. 

ईपीएफओने वैद्यकीय, शिक्षण, लग्न किंवा घरांसाठी ऑटो सेटलमेंट सुविधा सुरू केली आहे.

मॅन्युअल सेटलमेंटमध्ये लागतात ३० दिवस

मॅन्युअल सेटलमेंटमध्ये, ईपीएफओ कर्मचाऱ्यांकडून पीएफ दावे निकाली काढले जातात. त्यासाठी १५-३० दिवस लागतात. यासाठी, ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म (जसे की फॉर्म १९, ३१, १०सी) भरावे लागतात. यानंतर, ईपीएफओ कर्मचारी तुमची कागदपत्रे, केवायसी आणि पात्रता तपासतात. 

जर तुम्ही एक्झिट डेट अपडेट केली नसेल किंवा कोणतेही कागदपत्र गहाळ असेल, तर दाव्याला विलंब होऊ शकतो

पैसे काढा एटीएम, यूपीआयद्वारे

ईपीएफओ ३.० च्या मसुद्यानुसार, कर्मचाऱ्यांना लवकरच एटीएम आणि यूपीआयमधून थेट पीएफचे पैसे काढण्याची सुविधा मिळू शकते.

टॅग्स :ईपीएफओपैसानिवृत्ती वेतनकर्मचारी