Join us

RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 11:31 IST

RIL share price: गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्सच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण दिसून येत होती. परंतु आता त्यात पुन्हा तेजीचं सत्र सुरू झालंय.

RIL share price: गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्सच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण दिसून येत होती. परंतु आता त्यात पुन्हा तेजीचं सत्र सुरू झालंय. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरला सिटीग्रुपच्या विश्लेषकांनी 'बाय' रेटिंग दिलं आहे. विश्लेषकांनी या शेअरची टार्गेट प्राइस १,५३० रुपयांपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच शुक्रवारच्या बंद किमतीपेक्षा हा शेअर २१ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या शेअरसाठी रिस्क रिवॉर्ड अनुकूल झाल्याचं ब्रोकरेजचं म्हणणं आहे. यामुळे हा शेअर गुंतवणुकीच्या दृष्टीनं चांगला असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

चीनच्या घटत्या निर्यात स्पर्धात्मकतेमुळे रिलायन्सचं रिफायनिंग मार्जिन सुधारेल, अशी सिटीची अपेक्षा आहे. टेलिकॉम सेगमेंटमध्ये जिओ टॅरिफमधील संभाव्य वाढ आणि डेटा किंमती वाढवण्याच्या संधींचा फायदा घेण्याच्या मजबूत स्थितीत आहे. यासोबतच 5जी रोलआऊटचा फायदाही वाढताना दिसू शकतो असं सिटीनं म्हटलंय.

मात्र, रिलायन्सच्या रिटेल सेगमेंटमधील मंदी पुढील काही तिमाहीपर्यंत कायम राहू शकते, असंही ब्रोकरेज कंपनीनं म्हटलंय. हे अल्पकालीन आव्हान असूनही रिलायन्सच्या सर्वच सेगमेंटमध्ये दीर्घकालीन वाढीच्या शक्यतांबाबत सिटी उत्साही आहे.

कंपनीचा नफा वाढला

रिलायन्स इंडस्ट्रीजची कामगिरी पाहता जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तिमाही आधारावर ९.४ टक्क्यांनी वाढ झाली. या कालावधीत कंपनीला १६,५६३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. टेलिकॉम आणि रिटेल सेक्टरच्या दमदार कामगिरीचा परिणाम कंपनीच्या निकालावर झाला. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचं कामकाजातून मिळणारं उत्पन्न २.३५ लाख कोटी रुपये होतं, जे मागील तिमाहीतील २.३६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत किंचित कमी आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्सशेअर बाजारगुंतवणूक