Join us

नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 21:04 IST

GST on Health Insurance: हेल्थ इन्शुरन्सवर येत्या २२ सप्टेंबरपासून जीएसटी शून्य होणार आहे. तरीही इन्शुरन्स कंपन्यांनी गिऱ्हाईक बनविण्याचा खेळ सुरु केलेला आहे. रिलायन्स सारख्या कंपनीने यासाठी २२ सप्टेंबरची देखील वाट पाहिलेली नाही.

- हेमंत बावकर

केंद्र सरकारने हेल्थ इन्शुरन्स, जीवन विमा आदी गोष्टी शून्य जीएसटीमध्ये आणल्या आहेत. परंतू कंपन्या काही केल्या २२ सप्टेंबरपर्यंत थांबायचे नाव घेत नाहीएत. २२ ऑक्टोबरला ड्यू असणारा हेल्थ इन्शुरन्सचा प्रिमिअमचा मेसेज रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने १८ टक्के जीएसटी लावून एकूण रक्कम भरण्यासाठी पाठविला आहे. 

हेल्थ इन्शुरन्सवर येत्या २२ सप्टेंबरपासून जीएसटी शून्य होणार आहे. तरीही इन्शुरन्स कंपन्यांनी गिऱ्हाईक बनविण्याचा खेळ सुरु केलेला आहे. रिलायन्स सारख्या कंपनीने यासाठी २२ सप्टेंबरची देखील वाट पाहिलेली नाही. त्यांनी ७ सप्टेंबरलाच म्हणजेच जवळपास दीड महिना आधी तुमचा इन्शुरन्स रिन्यू करायचा आहे, त्याची रक्कम 26,245 रुपये असल्याचा व ते भरावेत असा मेसेज पाठविला आहे. 

रिलायन्स जनरलने पाठविलेल्या मसेजमध्ये पेमेंटसाठी लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक केल्यास या ग्राहकाला Net Premium     ₹ 26,245 आणि त्यावर जीएसटी ₹ 4,724 असा एकूण Final Premium ₹ 30,969 रुपये एवढा येत आहे. महत्वाचे म्हणजे या ग्राहकाची नूतनीकरणाची तारीख ही २२ ऑक्टोबर आहे. ऑटोमोबाईल कंपन्या आपले दर कमी केल्याचे जाहीर करत असताना सरकारने ज्या उद्देशाने आरोग्य क्षेत्रातील ३० हून अधिक जीवनावश्यक औषधे, आणि इन्शुरन्सवरील जीएसटी शून्यावर नेलेला असताना कंपन्या ही खेळी करत आहेत. 

ग्राहकांकडे इन्शुरन्स पोर्ट करण्याचा देखील पर्याय आहे. परंतू, जर मूळ कंपनीने सेवा चांगली दिली असेल तर मग या आगाऊ भरण्याचे मेसेज पाठविण्याची गरज कंपन्यांना का पडत असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच जर सरकारने एवढा चांगला निर्णय घेतलाच आहे तर मग तुमचा प्रिमिअम २२ ऑक्टोबरला ड्यू आहे, २२ सप्टेंबरनंतर भरलात तर तुम्हाला जीएसटी भरावा लागणार नाही, अशा आशयाचा मेसेज का नाही पाठविला, असाही सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :जीएसटीरिलायन्सआरोग्य