Reliance Power News:अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील 'रिलायन्स पॉवर'च्या शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तेजी दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच आज(शुक्रवार) कंपनीचा शेअर जवळपास 13 टक्क्यांनी वधारला. गेल्या पाच वर्षांत या शेअरमध्ये तब्बल 1670 टक्के वाढ झाली आहे. एकीकडे कंपनीचा शेअर वधारत आहे, तर दुसरीकडे कंपनीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला अटक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडी (प्रवर्तन संचालनालय) ने कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) अशोक कुमार पाल यांना बनावट बँक हमी (बँक गॅरंटी) घोटाळ्याच्या आरोपात अटक केली आहे. ही अटक केवळ कंपनीसाठीच नव्हे, तर अंबानी समूहाच्या प्रतिमेसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी अशोक कुमार पाल यांना गुरुवारी मध्यरात्री दिल्लीतील त्यांच्या कार्यालयातून दीर्घ चौकशीनंतर ताब्यात घेतले. आज ईडीची टीम त्यांना दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात हजर करणार असून, पुढील चौकशीसाठी कोठडीची मागणी केली जाणार आहे.
ईडीच्या कारवाईमागचे कारण
इंडिया टुडेच्या माहितीनुसार, अशोक पाल यांच्यावर सुमारे 68.2 कोटी रुपयांच्या संशयास्पद बँक हमी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. ईडीने रिलायन्स समूहातील आर्थिक गैरव्यवहारांबाबत सुरू केलेल्या तपासात ही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 2024 मध्ये दाखल झालेल्या एफआयआरवर आधारित असून, त्यात सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) ला बनावट बँक हमी देण्यात आल्याचे नमूद आहे.
ही बनावट बँक हमी अनिल अंबानी यांच्या दोन कंपन्यांच्या - रिलायन्स न्यू बीईएसएस लिमिटेड आणि महाराष्ट्र एनर्जी जनरेशन लिमिटेड नावाने जारी करण्यात आली होती. अशोक पाल हे रिलायन्स पॉवरचे एक्झिक्युटिव डायरेक्टर म्हणूनही काम पाहतात आणि गेल्या सात वर्षांपासून कंपनीशी जोडलेले आहेत. ते अनिल अंबानी यांचे विश्वासू अधिकारी मानले जातात.
ईडीला कोणते पुरावे मिळाले पुरावे
तपासादरम्यान ईडीला हे स्पष्ट झाले की, या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहारात ओडिशातील बिस्वाल ट्रेडलिंक नावाच्या कंपनीचा सहभाग होता. ईडीच्या माहितीनुसार, बनावट बँक हमी याच कंपनीद्वारे तयार करण्यात आली होती. या गॅरंटीच्या बदल्यात कंपनीचा संचालक पार्थ सारथी बिस्वाल याने ८ टक्के कमिशन घेतल्याचे उघड झाले. ईडीने ऑगस्ट 2025 मध्ये त्याला अटक केली होती.
तपासात हेही समोर आले की, अशोक पाल यांनी कोट्यवधी रुपयांचे बनावट ट्रान्सपोर्ट बिल्स तयार करुन पैसे ट्रान्सफर केले. हे व्यवहार व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारख्या अॅप्सवरून मंजूर करण्यात आले, जेणेकरून कंपनीच्या अधिकृत सिस्टीमवर त्याचा मागोवा लागू नये.
रिलायन्स पॉवरचे शेअर वधारले
रिलायन्स पॉवरचा शेअर 9 ऑक्टोबर 2020 रोजी फक्त ₹2.75 होता, तर 10 ऑक्टोबर 2025 रोजी वाढून ₹50.70 झाला आहे. म्हणजेच पाच वर्षांत 1670 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. परंतु आता ईडीच्या या कारवाईमुळे बाजारात गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार दिसण्याची शक्यता आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)