Join us
Daily Top 2Weekly Top 5

Post Office Account: पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटचे आहेत अनेक फायदे, फक्त द्यावं लागतं 'हे' शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 16:32 IST

पोस्ट ऑफिस स्कीम हे सुरक्षित गुंतवणुकीचं आणि हमीपरताव्याचं साधन मानलं जातं.

पोस्ट ऑफिस स्कीम हे सुरक्षित गुंतवणुकीचं आणि हमीपरताव्याचं साधन मानलं जातं. यामध्ये सर्व वयोगटातील/उत्पन्न गटातील लोक बचत आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते देखील उघडू शकता. यावर, तुम्हाला बँक खात्याप्रमाणेच सुविधा मिळतात. हे खाते कोणतीही प्रौढ किंवा अल्पवयीन व्यक्ती उघडू शकते. यामध्ये पैसे जमा करण्याची कोणतीही मर्यादा नाही आणि तुम्हाला यावर १० हजार रुपयांपर्यंत कर सवलत देखील मिळते. या खात्यावर तुम्हाला वर्षाला ४ टक्के व्याज मिळते. पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या सुविधांवर तुम्हाला कोणत्याही बँक खात्याच्या तुलनेत खूपच कमी शुल्क द्यावं लागतं.

कोणत्याही बँक खात्याप्रमाणे तुम्हाला यावरही काही शुल्क भरावं लागेल. देखभाल, पैसे काढणं अशा अनेक सुविधा आहेत ज्यावर तुम्हाला शुल्क भरावं लागेल. आम्ही तुम्हाला अशाच शुल्कांविषयी माहिती देणार आहोत.

१. तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात किमान ५०० रुपये असावेत. जर रक्कम या मर्यादेच्या खाली आली आणि आर्थिक वर्षाच्या अखेरीस या मर्यादेपेक्षा कमी राहिली तर ५० रुपये मेंटेनन्स शुल्क कापले जाईल. जर तुमच्या खात्यात पैसेच नसतील तर ते आपोआप रद्द होईल.

२. डुप्लिकेट पासबुक जारी करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये द्यावे लागतील.

३. अकाऊंट स्टेटमेंट किंवा डिपॉझिट रसिट जारी करण्यासाठी तुम्हाला २०-२० रुपये द्यावे लागतील.

४. सर्टिफिकेट हरवलं अथवा खराब झाल्यास पासबुक जारी करण्यासाठी प्रत्येक नोंदणीवर १० रुपये आकारले जातील.

५ अकाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी आणि अकाऊंट प्लेज करण्यासाठी १००-१०० रुपये आकारले जातात.

६. नॉमिनीचं नाव बदलणं किंवा कॅन्सल करण्यासाठी ५० रुपये आकारले जातात.

७. चेकच्या गैरवापरासाठी तुम्हाला १०० रुपयांचं शुल्क द्यावं लागतं.

८. एका वर्षात चेक बुकचे १० लीफ तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय वापरू शकता. यानंतर प्रत्येक लीफवर २ रुपये शुल्क आकारलं जातं.

कोणत्या सुविधा मिळतात?तुम्ही तुमच्या खात्याशी संबंधित सुविधांचा लाभ घेऊ शकता, त्यांचा पुरेपूर वापर करू शकता. यासाठी तुम्हाला त्यावर अनेक अतिरिक्त सुविधाही मिळतील.

  • चेक बुक
  • एटीएम कार्ड
  • ई-बँकिंग/मोबाइल बँकिंग
  • आधार लिंकिंग
  • अटल पेन्शन योजना
  • पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकपैसा