Join us  

पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याचे संकेत; 'कच्चं तेल' मोदी 2.0 ला देणार 'पक्की' साथ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 3:26 PM

सोमवारी कच्च्या तेलाची किंमत घसरून 61 डॉलर प्रती बॅरल झाली होती.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 9 डॉलरनी कमी झाल्या आहेत. यामुळे मोदी देशवासियांना पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्याची शक्यता आहे. कारण मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हाही तेलाच्या किंमती कमी झाल्या होत्या. 

सोमवारी कच्च्या तेलाची किंमत घसरून 61 डॉलर प्रती बॅरल झाली होती. गुरुवारी ही किंमत 70 डॉलर होती. चार दिवसांत तब्बल 9 डॉलरनी तेलाची किंमत उतरली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे अमेरिका, चीन आणि मेक्सिकोसारख्या काही देशांमध्ये व्यापारावरून वाढलेला तणाव असून यामुळे जागतिक मंदीचे ढग जमा होऊ लागले आहेत. 

देशाच्या तेल बाजारावर या व्यापार युद्धाचा परिणाम दिसू लागला असून 29 मे पासून पेट्रोल 56 आणि डिझेल 93 पैशांनी स्वस्त झाले आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेल जर असेच घसरत राहीले तर भारतात इंधनाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय इंधन पुरविणाऱ्या कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार दर दिवशी दर ठरवत असतात. मात्र, किंमत कमी करायची असल्यास लगेचच कमी केली जात नाही. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार योजनेमुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर भीतीचे वातावरण आहे. यामुळे तेलाची किंमत कमी होऊ शकते. त्यातच अमेरिका तेलाचे उत्पादन वाढविण्याचीही शक्यता आहे. यामुळे इराण आणि व्हेनेझुएलामधून तेलाचा पुरवठा कमी होण्याचा परिणाम कमी होणार आहे. 

अमेरिकेने ईराणला दिलेली सूट मागे घेतल्याने अनेक देशांना इराणकडून तेल मागविता येत नव्हते. यामध्ये भारताचाही समावेश होता. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 75 डॉलरवर गेल्या होत्या. 

दर कमी झाल्यास...बॅरलचे दर कमी झाल्यास त्याचा थेट फायदा भारताला होणार आहे. कारण भारत त्याच्या गरजेच्या 84 टक्के तेल आयात करतो. मात्र, जागतिक मंदी आल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे. मोदींच्या पहिल्या पंतप्रधान काळात इंधनाच्या किंमती कमी झाल्याने महागाई आटोक्यात आणण्यास मदत झाली होती. तसेच आयात कर आणि अनुदानही कमी झाले होते. आता पुन्हा तेलाच्या किंमती घसरणे आणि मोदींचा दुसरा कार्यकाळ सुरु होणे हा योगायोगच म्हणावा लागेल.

टॅग्स :पेट्रोलतेल शुद्धिकरण प्रकल्पनरेंद्र मोदीडोनाल्ड ट्रम्पइंधन दरवाढ