Petrol Diesel Price Hike: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिलेत की, जर पश्चिम आशियातील संकट दीर्घकाळ सुरू राहिलं, तर सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करावी लागू शकते. त्यांच्या या विधानामुळे सर्वसामान्य नागरिक आणि बाजारपेठ दोघांचीही धाकधूक वाढली आहे.
पुरवठ्यावर परिणाम आणि कच्च्या तेलाचा भडका
स्वित्झर्लंडमधील एका परिषदेत बोलताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, पश्चिम आशियातील संघर्ष आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे कच्चं तेल आणि वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. भारत आपल्या गरजेचा मोठा भाग आयातीद्वारे पूर्ण करतो, त्यामुळे तेल महागल्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि जनतेच्या खिशावर होतो.
महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
अद्याप किमती स्थिर, पण दबाव वाढतोय
फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या संकटानंतरही सरकारनं अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते जर कच्च्या तेलाचे दर असेच चढे राहिले, तर तेल कंपन्यांवरील दबाव वाढेल. ही दरवाढ ग्राहकांपर्यंत पोहोचवणं ही आता केवळ वेळेची बाब असू शकते, असं गव्हर्नर यांनी स्पष्ट केलंय.
रुपयाची घसरण आणि महागाईचे सावट
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम भारतीय रुपयावरही होत असून, डॉलरच्या तुलनेत रुपया ९५ च्या खाली पोहोचला आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात अधिक महाग होते, ज्याचा परिणाम इंधनाच्या किमती वाढण्यात होतो.
पंतप्रधानांचं आवाहन आणि भविष्यातील चिंता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि गरजेच्या वस्तू जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी सरकार विविध उपाययोजनांचा विचार करत आहे. दरम्यान, जर पेट्रोल आणि डिझेल महागलं तर केवळ वाहतूकच महागणार नाही, तर अन्नधान्यापासून दैनंदिन वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टींचे दर वाढतील, ज्यामुळे महागाईचा अधिकच भडका उडण्याची शक्यता आहे.
Web Summary : Concerns rise as RBI Governor signals potential petrol and diesel price hikes due to ongoing West Asia crisis impacting crude oil supply. This could burden citizens and fuel inflation, especially with a weakening rupee.
Web Summary : आरबीआई गवर्नर ने पश्चिम एशिया संकट के कारण कच्चे तेल की आपूर्ति प्रभावित होने से पेट्रोल और डीजल की कीमतों में बढ़ोतरी की आशंका जताई। इससे नागरिकों पर बोझ बढ़ेगा और मुद्रास्फीति बढ़ेगी, खासकर रुपये के कमजोर होने से।