Join us
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:02 IST

Pakistan Crisis : इराण-अमेरिका युद्धाचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानला बसत आहे. देशात महागाई प्रचंड वाढली असून रोजच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे.

Pakistan Crisis : मध्यपूर्वेतील युद्ध आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीतील तणावाचा सर्वाधिक फटका भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला बसला आहे. आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर आहे. इंधनाच्या टंचाईमुळे केवळ पेट्रोल-डिझेलच महागले नाही, तर पीठ, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

१. इंधनाचा भडका: ५२० रुपयांवर डिझेलजागतिक तेल संकटामुळे पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ऐतिहासिक वाढ केली आहे. डिझेल ५२०.३५ रुपये प्रति लीटरवर पोहचले आहे. तर पेट्रोल ४५८.४१ रुपयांवरून सध्या ३७८ रुपयांवर (जनतेच्या विरोधानंतर कपात) आले आहे. इंधनाच्या या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून मालवाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

२. कर्जाचा डोंगर आणि युएईचा अल्टिमेटमपाकिस्तानवर जानेवारी २०२६ पर्यंत एकूण ७९,३२२ अब्ज पाकिस्तानी रुपयांचे कर्ज झाले आहे, जे त्यांच्या जीडीपीच्या ७०% आहे. आयएमएफ आणि इतर देश आता नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. संयुक्त अरब अमिरातीने या महिन्या अखेरपर्यंत ३.५ अब्ज डॉलरचे जुने कर्ज परत करण्याचा आदेश दिल्याने शहबाज शरीफ सरकारची झोप उडाली आहे.

३. महागाईचा उच्चांक: अन्नान्न दशाइराण-अमेरिका युद्ध आणि अफगाणिस्तानसोबतच्या तणावामुळे जीवनावश्यक वस्तूंची आयात रोखली गेली आहे. पाकिस्तानचा सीपीआय महागाई दर ७.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दूध, पीठ, डाळ आणि खाद्यतेलाच्या किमतीत बेसुमार वाढ झाल्याने गरिबांच्या ताटातून घास हिरावला जात आहे.

४. अर्थव्यवस्थेची 'नकारात्मक' वाटचालपाकिस्तानचे माजी अर्थमंत्री हाफिज पाशा यांच्या मते, जर कच्चे तेल १०० डॉलरच्या पार राहिले, तर पाकिस्तानच्या जीडीपीवर १ ते १.५% नकारात्मक परिणाम होईल. पुढील वर्षी पेट्रोलियम आयातीमुळे पाकिस्तानला १४ अब्ज डॉलरचा फटका बसू शकतो. कच्चे तेल १२० डॉलरवर गेल्यास महागाईचा दर रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणे ३० टक्क्यांवर पोहोचू शकतो.

वाचा - एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?

५. रात्री ८ नंतर पाकिस्तानात 'ब्लॅकआउट'ऊर्जा बचतीसाठी सरकारने कोरोना काळातील अत्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. ७ एप्रिलपासून देशातील सर्व मॉल आणि बाजारपेठा रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी गाड्यांच्या वापरात ६०% कपात, मंत्र्यांच्या पगार कपात आणि बैठका ऑनलाईन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थोडक्यात, पाकिस्तान आता अंधारात बुडू लागला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War's Impact: Pakistan's Crisis Deepens with Inflation, Curbs

Web Summary : Pakistan faces economic collapse due to Middle East tensions, rising fuel costs (diesel at 520 rupees), and debt. Inflation soars, essential goods become unaffordable, and energy-saving measures like early market closures are implemented.
टॅग्स :पाकिस्तानअमेरिका-इस्रायल-इराण वॉरइंधन टंचाईएलपीजी गॅस टंचाईइंधन दरवाढ