OYO : देशभरात ओळखले जाणारे हॉटेल बुकिंग ॲप ओयो (OYO) आता फक्त भारतातच नाही, तर जगभरात आपलं 'घर' तयार करत आहे! ओयोच्या हॉलिडे होम्स सांभाळणाऱ्या 'बेलव्हिला बाय ओयो' (Belvilla by OYO) या युनिटने ऑस्ट्रेलियातील एक मोठी कंपनी 'मेडकॉम्फी' (MadeComfy) विकत घेतली आहे. या करारामुळे ओयोला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये थेट एन्ट्री मिळाली आहे.
काय आहे 'मेडकॉम्फी'?'मेडकॉम्फी' ही २०१५ मध्ये सुरू झालेली एक ऑस्ट्रेलियन कंपनी आहे, जी लोकांना त्यांचे रिकामे घर किंवा अपार्टमेंट भाड्याने देण्यासाठी मदत करते. म्हणजेच, तुमच्याकडे एखादं घर असेल आणि ते तुम्ही कमी कालावधीसाठी (उदा. सुट्ट्यांमध्ये) पर्यटकांना भाड्याने देऊ इच्छित असाल, तर मेडकॉम्फी तुमच्यासाठी पाहुणे शोधण्यापासून ते घराची देखभाल करण्यापर्यंत सर्व काम करते. सध्या ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये १,२०० पेक्षा जास्त मालमत्तांचं व्यवस्थापन करतात.
ओयोने ही कंपनी रोख पैसे आणि स्वतःच्या शेअर्सच्या (हिस्स्याच्या) बदल्यात विकत घेतली आहे. सुरुवातीला ओयो, मेडकॉम्फीला सुमारे १६ कोटी रुपयांचे शेअर्स देईल. यामुळे ओयोचं एकूण मूल्य आता जवळपास ४२,५०० कोटी रुपये झालं आहे. याशिवाय, पुढील दोन वर्षांनी आणखी ८१ कोटी रुपयांचे शेअर्स दिले जातील.
ओयोची जगाला 'घर' करण्याची मोहीमओयोचा आंतरराष्ट्रीय विस्तार करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये त्यांनी युरोपातील 'युरोपियन लीझर ग्रुप' विकत घेतला होता, ज्यातून त्यांना 'बेलव्हिला' हा ब्रँड मिळाला. आज 'बेलव्हिला बाय ओयो'कडे युरोपातील २० देशांमध्ये ५०,००० हून अधिक हॉलिडे होम्स आहेत.
डिसेंबर २०२४ मध्ये, ओयोने अमेरिकेतील G6 हॉस्पिटॅलिटी ही कंपनी तब्बल ५२५ दशलक्ष डॉलरमध्ये (सुमारे ४,४६० कोटी रुपये) विकत घेतली. यामुळे त्यांना अमेरिका आणि कॅनडामध्ये १,५०० पेक्षा जास्त हॉटेल्स मिळाली.
वाचा - तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
थोडक्यात, ओयो आता केवळ भारतातीलच नाही, तर जगातील अनेक महत्त्वाच्या पर्यटन आणि निवासाच्या बाजारपेठांमध्ये आपला व्यवसाय वेगाने वाढवत आहे. या अधिग्रहणामुळे ओयोची जागतिक ताकद आणखी वाढणार आहे, ज्यामुळे त्यांना जगभरातील प्रवाशांना अधिक चांगले पर्याय देता येतील.